धर्मशाला :  टीम इंडियाच्या लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारानं धर्मशाला कसोटीत अर्धशतकं झळकावली. कर्णधार अजिंक्य रहाणेचं अर्धशतक तर केवळ चार धावांनी हुकलं. पण या कसोटीच्या पहिल्या डावात आघाडी मिळवण्यासाठी टीम इंडियाचा संघर्ष अजूनही सुरु आहे.


धर्मशाला कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी भारतीय संघानं सहा बाद 248 धावांची मजल मारली होती. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 300 धावांची मजल मारली होती. त्यामुळे कांगारुंच्या हाताशी अजूनही 52 धावांची आघाडी आहे.

ही पिछाडी भरुन काढण्यासाठी टीम इंडियाची मदार प्रामुख्यानं यष्टीरक्षक रिद्धिमान साहा आणि रवींद्र जाडेजा यांच्यावर आहे. दुसऱ्या दिवसअखेर साहा 10 आणि जाडेजा 16 धावांवर खेळत आहे.

ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथन लायननं भारतीय फलंदाजांवर पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलं. त्यानं 67 धावांच्या मोबदल्यात भारताच्या चार प्रमुख फलंदाजांना माघारी धाडलं.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील धर्मशाला कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने सुरुवातीच्या धक्क्यानंतर टिच्चून फलंदाजी केली. सलामीवीर मुरली विजय स्वस्तात माघारी परतल्यानतंर लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजाराने भारताची बाजू सांभाळली.

उपहारापर्यंत भारताने एक बाद 64 धावांपर्यंत मजल मारली होती.

धर्मशाला कसोटीचा पहिला दिवस भारताचा

धर्मशाला कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा नवोदित फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या धडाकेबाज गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव पहिल्याच दिवशी 300 धावांत आटोपला.

पदार्पणाच्या कसोटीत कुलदीप यादवने 4 विकेट्स घेतल्या. तर उमेश यादवने 2 तर अश्विन, जाडेजा आणि भुवनेश्वरने प्रत्येक 1  विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्हने सर्वाधिक 111 तर विकेटकिपर मॅथ्यू वेडने 57 धावा केल्या.

धर्मशाला कसोटीत नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. उमेश यादवने  मॅट रेनशॉची त्रिफळा उडवून कांगारुंना पहिला धक्का दिला. रेनशॉ अवघी 1 धाव करुन माघारी परतला.

त्यानंतर आलेल्या कर्णधार स्टीव्हने खेळाची सूत्रं हाती घेऊन भारतीय गोलंदाजांवर आक्रमण केलं. स्मिथ- वॉर्नर या जोडीने शतकी भागादारी रचली. या जोडीने ऑस्ट्रेलियाला उपहारापर्यंत 1 बाद 131 अशी मजल मारुन दिली.

या जोडीने भारतीय गोलंदाजीवर आक्रमण करुन धावसंख्या वेगाने वाढवली. मात्र उपहारानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अक्षरश: नाचवलं.

उपाहारानंतर सलामीवीर डेव्हिड वॉर्नरपाठोपाठ शॉन मार्शही तातडीने माघारी परतला. फिरकीपटू कुलदीप यादवने वॉर्नरच्या रुपाने कसोटीतील पहिली विकेट आपल्या नावे केली आणि ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. वॉर्नर 56 धावा करुन माघारी परतला.

त्यानंतर उमेश यादवने  ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. शॉन मार्श 4 धावा करुन माघारी परतला. तर अश्विननं शतकवीर स्मिथची झुंज मोडून काढली.स्मिथ 111 धावा करुन माघारी परतला.

मग कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का दिला.  यादवने कमिन्स (21) ला माघारी धाडत सातवी विकेट घेतली.  कुलदीपची ही चौथी विकेट ठरली. त्यानंतर ओकिफ, मॅथ्यू वेड आणि नॅथन लायनला झटपट माघारी धाडत, भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 300 धावांत गुंडाळला.

संबंधित बातम्या :

IndvsAus : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांत आटोपला


82 वर्षांच्या कसोटी इतिहासातला पहिला चायनामन कुलदीप यादव


टीम इंडियासाठी स्वत: कोहली बनला वॉटर बॉय!


ब्रेट ली म्हणतो 'जगातला सर्वात महागडा ड्रिंक्समन मैदानात'


अश्विनचा विक्रम, एकाच मोसमात सर्वाधिक बळी घेणारा क्रिकेटपटू