कोलकाता : श्रीलंकेविरुद्धच्या कोलकातामधील पहिल्या कसोटीत चेतेश्वर पुजाराने झुंजार खेळी करुन टीम इंडियाची एक खिंड थोपवून धरली आहे. त्यामुळे दुसऱ्य़ा दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला त्या वेळी भारताला 5 बाद 74 अशी मजल मारता आली होती.


भारताच्या पुजारा आणि अजिंक्य रहाणेने कालच्या तीन बाद 17 धावांवरुन दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. श्रीलंकेच्या दासून शनाकाने अजिंक्य रहाणे आणि रवीचंद्रन अश्विनला माघारी धाडून टीम इंडियाची पाच बाद 50 अशी बिकट अवस्था केली होती.

मात्र चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या खिंडीतून श्रीलंकेच्या माऱ्याचा समर्थपणे सामना केला. त्याने 102 चेंडूंत 9 चौकारांसह नाबाद 47 धावांची खेळी उभारली.



एकीकडे पुजारा टिच्चून फलंदाजी करत असताना, अजिंक्य रहाणे चाचपडत होता. राहणेला मोठी खेळी करता आली नाही. रहाणेला दसून शनाकाने अवघ्या चार धावांवर माघारी धाडत, भारताला चौथा धक्का दिला.

त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या आर अश्विनने 29 चेंडू खेळून काढले, मात्र त्यालाही अवघ्या चार धावांवर बाद करत शनाकाने श्रीलंकेला पाचवं यश मिळवून दिलं.



त्याआधी सुरंगा लकमलने टिच्चून गोलंदाजी करत, भारतीय फलंदाजांना अक्षरश: धडकी भरवली. लकमलने एक-दोन नव्हे तर तब्बल 7 षटकं निर्धाव टाकली. लकमलच्या 46 व्या चेंडूवर भारतीय फलंदाजांना धाव घेता आली.

लगमलने हा नवा विक्रम रचला आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजच्या जेरोम टेलरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2015 मध्ये सलग 40 चेंडू निर्धाव टाकले होते. तो विक्रम आता लकमलने मोडला आहे. 2001 नंतर लकमलचा हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम स्पेल असल्याचं म्हटलं जात आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ

कोलकात्याच्या पहिल्या कसोटीत पहिल्या दिवशी पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळं केवळ अकरा षटकं आणि पाच चेंडूंचाच खेळ होऊ शकला. पण त्या कालावधीतही श्रीलंकेनं टीम इंडियाची तीन बाद 17 अशी दाणादाण उडवली. पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला, त्या वेळी चेतेश्वर पुजारा आठ धावांवर, तर अजिंक्य रहाणे शून्यावर खेळत होता.

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलनं ढगाळ हवामान आणि अनुकूल खेळपट्टीचा लाभ उठवून भारताच्या प्रमुख फलंदाजांची फळी कापून काढली.

लोकेश राहुल, शिखर धवन आणि विराट कोहली या तिन्ही फलंदाजांना लकमलनं एकही धाव न मोजता माघारी धाडलं. त्याचं पृथक्करण होतं सहा षटकं, सहा निर्धाव आणि एकही धाव न देता तीन विकेट्स.

याआधी १९५९ साली ऑस्ट्रेलियाच्या रिची बेनॉनं दिवसभरात एकही धाव न मोजता भारताच्या तीन विकेट्स काढल्या होत्या.