धर्मशाला: ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी धर्मशाला कसोटी आणि गावस्कर-बॉर्डर कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारताला दोन दिवसात 87 धावांची गरज आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी सलामीवीर मुरली विजय 6 आणि के एल राहुल 13 धावांवर खेळत होते.


उमेश यादव, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजानं ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 137 धावांत गुंडाळून टीम इंडियाला धर्मशाला कसोटीसह चार कसोटी सामन्यांची मालिकाही जिंकण्याची संधी मिळवून दिली आहे.

या कसोटीत टीम इंडियानं पहिल्या डावात 32 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं अजिंक्य रहाणे आणि त्याच्या शिलेदारांसमोर ही कसोटी आणि मालिका जिंकण्यासाठी अवघ्या 106 धावांचं आव्हान आहे.

त्या आव्हानाचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि मुरली विजयनं भारताला तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद 19 धावांची मजल मारून दिली आहे.

त्याआधी, ग्लेन मॅक्सवेलच्या 45 आणि मॅथ्यू वेडच्या नाबाद 25 धावांच्या खेळींचा अपवाद वगळला ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारतीय आक्रमणाचा आत्मविश्वासानं मुकाबला करू शकले नाहीत.

तिसऱ्या दिवसाची सुरुवात

भारतीय संघानं आज सहा बाद 248 धावांवरुन तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली.  आज जाडेजा आणि साहा यांनी सत्राची सुरुवात केली. जाडेजानं आपल्या शैलीत फलंदाजी करत शानदार अर्धशतक झळकावलं. तर साहानंदेखील चांगली फलंदाजी करत जाडेजाला साथ दिली. मात्र, जाडेजा बाद झाल्यानंतर तळाचे फलंदाज झटपट बाद करण्यात कांगारुंना यश आलं. भारताचा पहिला डाव 332 धावांत आटोपला.

रवींद्र जडेजानं केलेली 63 धावांची खेळी या आघाडीत महत्वाची ठरली.

ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायननं सर्वाधिक 5 गडी बाद केले. तर कमिन्सनंही 3 बळी घेतले.