Argentina vs France Final: जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत अर्जेंटिनानं फ्रान्सवर मात करत जेतेपद पटकावलं. अर्जेंटिनानं 36 वर्षांनी फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup) वर आपलं नाव कोरलं. अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं रोमहर्षक लढतीत फ्रान्सचा पराभव केला. तेव्हापासून अर्जेंटिना आणि त्याचा कर्णधार लियोनेल मेस्सी (Lionel Messi) यांचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. अर्जेंटिनाच्या विजयाचा भारताच्या अनेक भागात जल्लोष साजरा करण्यात आला. सोशल मीडियावर मेस्सीवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत होता.
तसं पाहिलं तर मेस्सीचे चाहते संपूर्ण जगभरात आहेत. भारतातही मेस्सीच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. भारतीय चाहत्यांकडूनही मेस्सीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण याच दरम्यान, आसाममधील एका काँग्रेस खासदारानं मेस्सीसंदर्भात केलेलं वक्तव्य भलतंच चर्चेत आलं आहे. मेस्सीचं भारत कनेक्शन सापडलं आहे. मात्र, मेस्सीचा भारताशी संबंध जोडणंच काँग्रेसच्या खासदाराला महागात पडलं आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केलं आहे.
ट्वीट डिलीट करूनही दिलासा नाही
आसाम काँग्रेसचे खासदार अब्दुल खालिक (Congress MP Abdul Khaliq) यांनी ट्विटरवर मेस्सीचं अभिनंदन केलं आणि लिहिलं की, तुमचं मनापासून अभिनंदन, आम्हाला तुमच्या आसाम (Aasam) कनेक्शनचा अभिमान आहे. खालिक यांनी मेस्सीच्या आसाम कनेक्शनबाबत उल्लेख केल्यानंतर एका युजरनं नेमकं मेस्सी आणि आसामचं कनेक्शन काय? अशी विचारणा त्यांना केली. त्यावेळी अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीचा जन्म भारताच्या आसाममध्ये झाल्याचा दावा त्यांनी केला. त्याच्या या ट्वीटनंतर यूजर्स खालिक यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करत आहेत.
काँग्रेस खासदाराच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्रोल होत असल्याचं पाहून त्यांनी त्यांचं ट्वीट डिलीट केलं. पण खालिक यांना त्यांची चूक लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता. लोकांनी त्याच्या ट्वीटचे स्क्रीनशॉट घेतले आणि सोशल मीडियावर शेअर केले. याआधी तृणमूल काँग्रेसचे नेते रिजू दत्ता यांनी मेस्सीचं बंगाल कनेक्शन सांगितलं होतं. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये हा विजय अर्जेंटिनाचा नसून तृणमूल काँग्रेसचा आहे… जय बांगला, असं ट्वीट केलं होतं.
अर्जेंटिनानं 36 वर्षांचा दुष्काळ संपवला
अर्जेंटिनाच्या लियोनेल मेस्सीचं फिफा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अखेर साकार झालं. कतारच्या (Qatar) लुसेल स्टेडियमवरच्या अंतिम सामन्यात मेसीच्या अर्जेंटिनानं (Argentina) फ्रान्सचा (France) पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव केला आणि फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. त्याआधी हा सामना जादा वेळेत 3-3 असा आणि निर्धारित वेळेत 2-2 असा बरोबरीत सुटला होता. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात विजेतेपद पटकावण्याची अर्जेंटिनाची ही तिसरी वेळ ठरली. याआधी अर्जेंटिनानं 1978 आणि 1986 साली विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर तब्बल 36 वर्षांनी मेसीच्या अर्जेंटिनानं विश्वचषकावर पुन्हा आपलं नाव कोरलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :