Ajit Pawar on Ganesh Naik: राज्यात चांदा ते बांदा बिबट्यांचा हैदोस सुरूच आहे. दररोज एका ठिकाणी बिबट्याचा हैदोस होत असून अनेक ठिकाणी प्राणघात हल्ले होत आहेत. वनमंत्री गणेश नाईक बिबट्याच्या हल्ल्यावर भलताच उतारा शोधताना जंगलामध्ये एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय अत्यंत हास्यापद असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना दिली. अजित पवार यांनी बिबट्यांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली.
एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बिबटे पकडून वनतारामध्ये सोडणार असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, बिबट्यांची संख्या दोन हजारापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. मात्र, वनताराकडून 50 बिबट्यांपेक्षा जास्त बिबट्या घेऊ शकत नसल्याची माहिती राज्य सरकारला दिली असल्याचे त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की जंगलामध्ये एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद आहे. बिबट्यांच्या नसबंदीवर बोलताना ते म्हणाले की जरी नसबंदी केली, तरी त्याचे परिणाम दिसायला काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. ही माहिती त्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना दिली.
दुसरीकडे, वारंवार बिबट्यांकडून हल्ले होत आहेत. मानवी वस्तीमध्ये सुद्धा बिबट्या येत असल्याने नागरिकांमध्ये थरकाप उडाला आहे. कोल्हापूर, नाशिक, नागपूर, पुणे अशा विविध जिल्ह्यांमध्ये बिबट्याचा हैदोस सुरु आहे. त्यामुळे अनेक निष्पाप हल्ल्यांमध्ये रक्तबंबाळ होत आहेत. त्यामुळे जंगलाबाहेर बिबटे येऊ नयेत यासाठी जंगलामध्ये एक कोटी शेळ्या सोडण्याचा भलताच निर्णय वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतला होता.
काय म्हणाले होते गणेश नाईक?
गणेश नाईक यांनी म्हटले की, हिंस्त्र प्राण्यांना जे भक्ष्य पाहिजे ते भक्ष्य जंगलात उपलब्ध राहिलेले नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिबट्यांना खाण्यासाठी शेळ्या किंवा बकऱ्या गळ्यात टॅग घालून सोडण्याचा आमचा विचार आहे. जसा प्रत्येक गावात एक नंदी असतो, तशाचप्रकारे या शेळ्या-बकऱ्या असतील. तुमच्या मुलाबाळांना आणि कुटुंबाच्या सदस्यांना बिबट्याचा धोका होऊ नये म्हणून काही ठिकाणी वनखात्याने या शेळ्या सोडल्या आहेत. त्यांचं रक्षण तुम्ही करा, असे आवाहन गणेश नाईक यांनी नागरिकांना केले. त्यांनी सांगितले की, राज्यातील ज्या भागांमध्ये जास्त बिबटे आहेत, तेथील बिबटे आफ्रिकेला पाठवण्यासंदर्भातही विचार सुरु असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले. आफ्रिकेमध्ये वाघ, सिंह आहेत, पण तिकडे बिबटे नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील बिबटे आफ्रिकेला पाठवण्याची मागणी केली तर त्याचा विचार कराल का, अशी विचारणा आम्ही केंद्रीय वनखात्याला केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या