मुंबई : भारताच्या लिअँडर पेसनं कॅनडाच्या आदिल शमसुद्दिनच्या साथीनं लिऑन चॅलेंजर टुर्नामेंट जिंकून, यंदाच्या मोसमात पुरुष दुहेरीचं पहिलं विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेतल्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात पेस आणि शमसुद्दिन जोडीनं स्वित्झर्लंडचा लुका मार्गारोली आणि ब्राझिलचा कॅरो झॅम्पियरीचा 6-1, 6-4 असा धुव्वा उडवला.
लिअँडर पेसचं हे एटीपी चॅलेंजरमधलं विसावं विजेतेपद ठरलं. गेल्या सव्वीस वर्षात पेसनं वर्षाला किमान एक विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. लिऑन चॅलेंजर टूर स्पर्धेची फायनल ही पेसची यंदाच्या मोसमातली पहिलीच फायनल ठरली होती.
याआधी दुबई ओपन आणि डेलरे बीच ओपन स्पर्धेत पेसचं आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आलं होतं. लिऑन चॅलेंजर टूर स्पर्धेचं विजेतेपद पटकावून पेसनं रोहन बोपण्णाबरोबरच्या वैयक्तिक शर्यतीत किंचित आघाडी घेतली. उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस चषक लढतीसाठी त्या दोघांचाही भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.