मुंबई : भारताचं दीर्घकाळ प्रतिनिधित्व करणारा टेनिसवीर लिअँडर पेसला तब्ब्ल 27 वर्षांनी पहिल्यांदाच डेव्हिस चषकाच्या संघातून वगळण्यात आलं आहे. डेव्हिस चषकाच्या आशिया ओशनिया गटातल्या लढतीत भारताचा मुकाबला हा उझबेकिस्तानशी होत आहे.


भारताचा नॉन प्लेईंग कर्णधार महेश भूपतीनं दुहेरीच्या सामन्यासाठी रोहन बोपण्णाला पसंती दिली आहे. या सामन्यात बोपण्णा श्रीराम बालाजीच्या साथीनं खेळेल.

दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत बोपण्णा 24व्या, तर पेस 53व्या स्थानावर आहे. पेसनं जपानविरुद्धच्या डेव्हिस चषक लढतीच्या निमित्तानं 1990 साली भारतीय संघात पदार्पण केलं होतं. त्यानंतर गेल्या 27 वर्षांत पेसला फॉर्मच्या निकषावर पहिल्यांदाच वगळण्यात आलं आहे.

रोहन बोपण्णाची सर्व्हिस चांगली होत आहे, त्याचा खेळही उत्तम होत आहे, त्यात यंदाच्या मोसमात त्याची सुरुवातही छान झाली हेच लक्षात घेऊन त्याला दिलेल्या पसंतीचं भूपतीनं समर्थन केलं.

दरम्यान, भारतीय संघाच्या निवडीत महेश भूपतीनं निकष धाब्यावर बसवल्याचा आरोप लिअँडर पेसनं केला आहे.