मुंबई : आयसीसी क्रिकेट विश्वचषकात उपांत्य फेरीत न्यूझीलंडने टीम इंडियाचा 18 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे भारताचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं. उपांत्य फेरीतील सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यानंतर आलेल्या महेंद्रसिंग धोनीनेही संथ गतीने खेळी केली. त्यामुळे धोनीने आता निवृत्ती घ्यावी अशी चर्चा सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे.
मात्र धोनीच्या समर्थनार्थ ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर उभ्या राहिल्या आहेत. लता दीदींनी धोनीला उद्देशून भावनिक ट्वीट केलं आणि त्याचा बचाव केला. "नमस्कार एमएस धोनीजी. माझ्या असं कानावर आलं आहे की तुम्ही निवृत्तीचा विचार करत आहात. कृपया तुम्ही असा विचार करु नका. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, निवृत्तीचा विचार तुम्ही मनातही आणू नका", असं भावनिक ट्वीट लता दीदींनी धोनीसाठी केलं आहे.
विराटकडूनही धोनीचा बचाव
धोनीनं त्याच्या भविष्याच्या योजनांविषयी आपल्याला काहीही सांगितलं नसल्याचं कर्णधार विराट कोहलीनेही पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. न्यूझीलंडच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धोनीनं संथ खेळी उभारली. त्यानं एक खिंड लढवली, पण मोठे फटके खेळण्याचं टाळलं. धोनीच्या या खेळीचा भारतीय कर्णधार विराट कोहलीने बचाव केला.
धोनीने निवृत्ती घेऊ नये असं त्याच्या फॅन्सलाही वाटत आहे. धोनीची सध्या भारतीय क्रिकेट संघाला गरज आहे, अशी अनेकांची भावना आहे. त्यामुळेच धोनीच्या समर्थनार्थ #donotretiredhoni हा हॅशटॅश सध्या ट्विटरवर ट्रेडिंगमध्ये आहे.
न्यूझीलंडनं या सामन्यात टीम इंडियाचा 18 धावांनी पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 240 धावांचं आव्हान दिलं होतं. पण त्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला अवघ्या 221 धावांचीच मजल मारता आली. रवींद्र जाडेजा आणि महेंद्रसिंग धोनीनं सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी रचून भारताच्या विजयासाठी शिकस्त केली. जाडेजानं 59 चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांसह 77 धावांची खेळी उभारली. धोनीने 72 चेंडूंत एक चौकार आणि एक षटकारासह 50 धावांची खेळी केली.
संबंधित बातम्या
- कर्णधार विराट कोहलीच्या मते कशामुळे झाला भारताचा पराभव?
- INDvNZ : संपूर्ण स्पर्धेत फ्लॉप, परंतु 'त्याच्या' एका थ्रोमुळे भारताचं वर्ल्डकपमधलं आव्हान संपुष्टात
- जाडेजाच्या नावे नाक मुरडणाऱ्या संजय मांजरेकरकडून आता कौतुकाची थाप
- ICC World Cup 2019 | विराटचा विश्वचषकाच्या बाद फेरीत फ्लॉप शो...
- जाडेजाच्या नावे नाक मुरडणाऱ्या संजय मांजरेकरकडून आता कौतुकाची थाप