कोलंबो : दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराने कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत भारताला विजेतेपदाचा करंडक मिळवून दिला. या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना कार्तिकने सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियाने विजयासाठीचं लक्ष्य पार केलं.

अखेरच्या षटकात नव्हे, तर अखेरच्या चेंडूवर भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. अखेरच्या षटकात भारताला 12 धावांची गरज होती. 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ऑलराऊंडर खेळाडू विजय शंकर स्ट्राईकवर होता. दबाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता. सौम्या सरकारने पहिलाच चेंडू वाईड टाकला. त्यामुळे एक धाव भारताच्या खात्यात जमा झाली.

सौम्या सरकारने पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यामुळे नवखा खेळाडू विजय शंकरवरील दबाव आणखी वाढला. यष्टीरक्षकाच्या हातात गेलेल्या या चेंडूवर धाव घेता आली नाही.

दुसऱ्या चेंडूवर विजय शंकरने एक धाव घेतली आणि दिनेश कार्तिक स्ट्राईकवर आला. दुसरी धाव घेण्यासाठी विजय शंकरने नकार दिला. त्यामुळे दिनेश कार्तिक स्ट्राईकवर राहिला.

तिसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिकने एक धाव घेतली आणि पुन्हा एकदा विजय शंकर स्ट्राईकवर आला.

अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर विजय शंकरने शानदार चौकार ठोकला आणि भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र पुढच्याच म्हणजे पाचव्या चेंडूवर विजय शंकर मोठा फटकार मारण्याच्या नादात झेलबाद झाला.

सुदैवाने अखेरच्या चेंडूसाठी स्ट्राईकवर दिनेश कार्तिकच होता आणि विजयासाठी एका चेंडूत 5 धावांची आवश्यकता होता. सर्वांनी श्वास रोखून धरले होते. मात्र दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि मालिका भारताच्या खिशात टाकली.

दिनेश कार्तिकचा विश्वविक्रम

दिनेश कार्तिकने 8 चेंडूत 29 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. अखेरच्या चेंडूवर 5 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची गरज असताना षटकार ठोकणारा तो आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासातला पहिला खेळाडू ठरला आहे.