कोलंबो : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा यंदाच्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व करु शकणार नाही. मुंबई इंडियन्सच्या वैद्यकीय पथकानं केलेल्या चाचणीत तो अनफिट असल्याचं आढळून आलं आहे.


 
मलिंगाच्या डाव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याने आणखी चार महिने सक्तीची विश्रांती घेण्याची गरज असल्याचं निदान मुंबई इंडियन्सच्या वैद्यकीय पथकानं केलं आहे. त्यामुळे मलिंगाला श्रीलंका संघाच्या इंग्लंड दौऱ्यातून आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमधूनही माघार घ्यावी लागण्याची चिन्हं आहेत.

 
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे डॉक्टर 20 एप्रिलला मलिंगाच्या दुखापतीची वैद्यकीय चाचणी करणार आहेत. मलिंगाच्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रियेची गरज आहे की नाही, याचं निदान या चाचणीत करण्यात येईल.

 
दरम्यान, श्रीलंका क्रिकेट बोर्डानं मलिंगाला कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचंही वृत्त आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या परवानगीशिवाय मलिंगा भारतात दाखल झाला आणि तो मुंबई इंडियन्सच्या टीममध्येही सामील झाल्याचं कारण बोर्डानं दिलं आहे.