ललित मोदीने आपल्या इंस्टाग्रामवर एक लेटरहेड अपलोड केलं आहे. या कागदपत्रानुसार, धोनीला इंडिया सिमेंट कंपनीच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं होतं. या लेटरहेडमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, धोनीला 43,000 रुपये (बेसिक पे) दर महिना पगार देण्यात येईल.
धोनी टीम इंडियाचा ग्रेड-ए मधील खेळाडू आहे. लेटरहेडमधील पगार आणि त्याची एकूण कमाई यात बरीच तफावत आहे. पगाराच्या तुलनेनं त्याची कमाई अनेक पटीनं जास्त आहे. असं ललित मोदीचं म्हणणं आहे.
ललित मोदीच्या मते, 'धोनी 100 कोटी दरवर्षी कमावतो. अशावेळी श्रीनिवासनचा कर्मचारी होण्यास तो कसा काय तयार झाला? पैज लावा त्याचे असे अनेक करार असतील.' असा दावा ललित मोदीने केला आहे. यासोबतच त्याने एन. श्रीनिवासन, राजीव शुक्ला आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यावरही निशाणा साधला आहे. श्रीनिवासननं आयपीएल दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सला फायदा पोहचवल्याचा आरोपही ललित मोदीनं केला आहे.
ललित मोदी यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ललित मोदी अनेकदा बीसीसीआयवर वेगवेगळे आरोप लावतं. पण आता त्यांनी टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर आरोप केले आहेत.