विशाखापट्टणम : टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने विशाखापट्टणममध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात हॅटट्रिक साजरी केली. कुलदीपने घेतलेली ही वन डे क्रिकेटमधली दुसरी हॅटट्रिक ठरली आहे. त्याने 33 व्या षटकातल्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्य़ा चेंडूवर विंडीजच्या शे होप, जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफला माघारी धाडून विक्रमी हॅटट्रिक साजरी केली.


दोन एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत दोन हॅटट्रिक करणारा कुलदीप पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी कोणत्याही भारतीय गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान भारताकडून नोंदवण्यात आलेली ही एकदिवसीय क्रिकेटमधली आजवरची पाचवी हॅटट्रिक ठरली आहे. याआधी चेतन शर्मा, कपिल देव, मोहम्मद शमी आणि कुलदीपने हा पराक्रम गाजवला होता. कुलदीपने 2017 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली हॅटट्रिक घेतली होती.


एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक हॅटट्रिक करण्याचा विक्रम श्रीलंकेचा जलदगती गोलंदाच लसिथ मलिंगा याच्या नावावर आहे. मलिंगाने तीन हॅटट्रिक केल्या आहेत.


दरम्यान, काल झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या खणखणीत शतकांच्या जोरावर 5 बाद 387 धावांचा डोंगर उभारला. रोहित आणि राहुलने पहिल्या विकेटसाठी 227 धावांची भागीदारी रचली. रोहितने 138 चेंडूत 17 चौकार आणि 5 षटकारांसह 159 धावांची खेळी उभारली. तर राहुलने 104 चेंडूत 102 धावा केल्या. राहुलने त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतलं तिसरं शतक साजरं केलं. रोहित-राहुलनंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरनं चौथ्या विकेटसाठी अवघ्या 24 चेंडूत 72 धावांची भागिदारी केली. अय्यरने सलग दुसरं अर्धशतक झळकावताना 53 धावा कुटल्या. तर पंतने 39 धावांचे योगदान दिले.


त्यानंतर 388 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 280 धावात रोखले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. चायनामन कुलदीप यादवची हॅटट्रिक आणि मोहम्मद शमीच्या प्रभावी माऱ्यामुळे विंडीजचा डाव 280 धावांत आटोपला. कुलदीपने आणि शमीनं प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडले. तर जाडेजाने दोन विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजकडून शे होपनं 78 तर निकोलस पूरननं 75 धावांची खेळी केली.