कोलकाता: कोलकाता नाईट रायडर्सनं किंग्स इलेव्हन पंजाबचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला आपला दुसरा विजय साजरा केला.
ईडन गार्डन्सवरच्या या सामन्यात पंजाबनं कोलकात्याला विजयासाठी 171 धावांचं आव्हान दिलं होतं. गौतम गंभीरनं कर्णधाराला साजेशी खेळी करून कोलकात्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
कोलकात्यानं हा सामना तब्बल 21 चेंडू आणि आठ विकेट्स राखून जिंकला. गंभीरनं 49 चेंडूंत 11 चौकारांसह नाबाद 72 धावांची खेळी उभारली. तसंच आयपीएलच्या या मोसमात सर्वाधिक धावा केल्यानं गंभीर ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे.
दरम्यान, गंभीरला सुनील नारायण, रॉबिन उथप्पा आणि मनीष पांडेनं छान साथ दिली. त्याआधी, उमेश यादवनं 33 धावांत पंजाबच्या चार फलंदाजांना माघारी धाडून कोलकात्याच्या विजयाचा पाया रचला.