कोलंबो : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीनं कर्णधार कोहली आणि टीमचं बरंच कौतुक केलं आहे. 'विराट कोहली आणि टीम असामान्य कर्तृत्व करु शकतं. तशी त्यांची क्षमताही आहे. त्यामुळे भारत तीनही कसोटीत श्रीलंकेला पाणी पाजू शकतं.' असं यावेळी शास्त्री म्हणाला.

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत भारतानं 304 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मागील श्रीलंका दौऱ्यात भारताला पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

गुरुवारपासून दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार असून याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत शास्त्री म्हणाला की, 'संघातील बरेच खेळाडू मागील दोन वर्षापासून सोबत आहेत. त्यामुळे आता त्यांच्याकडे अनुभवही बराच आहे. त्यांनी आतापर्यंत ते सारं काही केलं आहे जे मोठमोठे खेळाडू करु शकलेले नाहीत. उदाहरण घ्यायचं झालं तर 20 वर्षापासून श्रीलंकेत एकही कसोटी मालिका भारत जिंकू शकलेलं नाही.'

शास्त्री पुढे म्हणाले की, 'जे आजवर मिळवता आलं नाही ते सारं काही मिळवण्याची क्षमता या संघामध्ये आहे.'

पहिल्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचं शास्त्रीनं कौतुक केलं आहे. 'मागील कसोटीत खेळाडूंनी चांगला खेळ केला. पण आम्हाला काही गोष्टींबाबत सुधारणा करण्याची गरज आहे.' असं शास्त्री म्हणाला.

दरम्यान, यावेळी शास्त्रीनं विराटचंही कौतुक केलं आहे. 'विराटनं 27-28 कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळे आता त्याची देहबोली बरीच बदलली आहे. तो आता परिपक्व कर्णधार आहे. वेळेनुसार तो आणखी परिपक्व होत जाईल. त्याचं वय पाहता त्यानं कमी वयात फार काही साध्य केलं आहे.' असंही शास्त्री म्हणाला.