KKR vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं कोलकात्याचा 8 विकेट्सनी धुव्वा उडवून गुणतालिकेतलं आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे. या सामन्यात कोलकात्यानं बंगलोरला अवघ्या 85 धावांचं आव्हान दिलं होतं. बंगलोरच्या फलंदाजांनी हे आव्हान 14व्या षटकातच आठ विकेट्स राखून पार केलं. बंगलोर सध्या 14 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.


या मोसमातील आरसीबीचा हा सातवा विजय आहे. यासह ती मुंबई इंडियन्सला मागे ठेवून पॉइंट टेबलमध्ये दुसर्‍या स्थानावर पोहोचली आहे. आरसीबीकडून मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत दोन निर्धाव षटकांसह केवळ आठ धावा देऊन तीन बळी घेतले.


धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का! दुखापतीमुळे ड्वेन ब्राव्होची आयपीएलमधून माघार


कोलकात्याच्या फलंदाजांचं लोटांगण
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या केकेआरची अत्यंत खराब सुरुवात झाली. दुसर्‍याचं षटकात केकेआरचा सलामीवीर राहुल त्रिपाठीने विकेट गमावली. पुढच्याच चेंडूवर नितीश राणाही खाते न उघडताच माघारी परतला.


यानंतर तिसऱ्या षटकात नवदीप सैनीच्या चेंडूवर शुभमन गिलही अवघ्या एका धावावर झेलबाद झाला. अशाप्रकारे केकेआरने त्यांचे तीन फलंदाज फक्त तीन धावांमध्ये गमावले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या टॉम बँटनने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. पण तोही केवळ 10 धावा करून सिराजच्या हाती झेलबाद झाला.


मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहलच्या भेदक माऱ्यासमोर कोलकात्याला 20 षटकात आठ बाद 84 धावाच करता आल्या. सिराजनं केवळ आठ धावांत तीन विकेट्स घेतल्या. तर चहलनंही दोन विकेट्स काढून त्याला चांगली साथ दिली. कोलकात्याकडून केवळ तीन फलंदाजांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. कर्णधार ऑईन मॉर्गननं सर्वाधिक 30 धावांचं योगदान दिलं.


सिराजची ऐतिहासिक कामगिरी


बंगलोरच्या मोहम्हद सिराजनं या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करताना चारपैकी दोन षटकं निर्धाव टाकली. आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात सामन्यात दोन निर्धाव षटकं टाकणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. त्यानं कोलकात्याच्या राहुल त्रिपाठी, नितीश राणा आणि टॉम बॅन्टन या आघाडीच्या फलंदाजांना माघारी धाडून बंगलोरच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.