मुंबई : वानखेडेच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबने दिलेल्या 231 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला केवळ 223 धावांपर्यंतच मजल मारता आली.
मुंबई इंडियन्सचे सलामीवीर फलंदाज पार्थिव पटेल आणि लेंडल सिमन्स यांनी धडाकेबाज सुरुवात करत 99 धावांची भागीदारी केली. मात्र 99 धावांवर पार्थिव पटेल 38 धावांवर बाद झाला. त्यानंतर अर्धशतकी खेळी करणारा सिमन्स 59 धावांवर माघारी परतला.
सिमन्स आणि पार्थिव माघारी परतल्यानंतर रोहित शर्माही अवघ्या 5 धावांवर बाद झाला. कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्याने शानदार खेळी करत मुंबईला विजयाच्या जवळ नेलं. पोलार्डने नाबाद 50 धावांची खेळी केली. मात्र 30 धावांवर हार्दिक पंड्या आणि 19 धावांवर कर्ण शर्मा बाद झाल्यानंतर मुंबईच्या हातातून विजय निसटला.
त्याआधी या सामन्यात रिद्धिमान साहाची नाबाद 93 धावांची खेळी आणि त्याला मार्टिन गप्टिल-ग्लेन मॅक्सवेलने दिलेली साथ यांच्या जोरावर पंजाबने 20 षटकांत तीन बाद 230 धावांचा डोंगर उभा केला.
साहाने सलामीला खेळून 55 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 93 धावांची खेळी केली. मॅक्सवेलने 21 चेंडूंत 2 चौकार आणि पाच षटकारांसह 47 धावांची खेळी केली. गप्टिलने 18 चेंडूंमध्ये 36 धावा फटकावल्या. शॉन मार्शनेही 25 धावांची तर अक्षर पटेलने 19 धावांची खेळी केली.
या पराभवानंतरही 18 गुणांसह मुंबई गुणतालिकेत अव्वलस्थानी कायम आहे. तर पंजाब 12 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. पंजाबला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आता उर्वरित दोन सामन्यांमध्ये विजय आवश्यक आहे.