नवी दिल्ली : इंडियान प्रीमियर लीगच्या 11 सिझनसाठी लिलाव प्रक्रिया पूर्ण होऊन काहीच दिवस झाले आहेत. या लिलाव प्रक्रियेत टीम मालकांनी खेळाडूंसाठी मोठ-मोठ्या बोली लावल्या. पण आता यानंतर आयपीएलमधील काही संघ चांगलेच अडचणीत सापडले आहेत. विशेष करुन, किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स संघासमोर कर्णधार निवडीचा यक्ष प्रश्न उपस्थित झाला आहे.
आयपीएल-11च्या लिलावावेळी दोन्ही संघाच्या मालकांनी एकापेक्षा चांगल्या खेळाडूंवर बोलू लावून, त्यांची खरेदी केली. पण दोन्ही संघांकडे असा एकही चेहरा नाही, जो संपूर्ण सिझनमध्ये संघाचं नेतृत्व करु शकेल. त्यातच किंग्स इलेव्हन पंजाबने आता आपल्या अधिकृत वेबसाईटवर काही खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली असून, त्यावर चाहत्यांकडून मतं मागवली आहेत.
किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये पाच असे खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे कर्णधार पदाची धूरा सोपवली जाऊ शकते. यात सर्वात पहिल्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू आर. अश्विनचं नाव आहे. त्याच्याकडे या सिझनसाठी किंग्स इलेव्हनचं कर्णधार पद सोपवलं जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
याशिवाय, युवराज सिंह, ख्रिस गेल, एरॉन फिंच आणि अक्षर पटेल यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे कर्णधार निवडीची जबाबदारी टीम मॅनेजर आणि मेंटॉर वीरेंद्र सहवागवर याच्याकडे आहे.
दरम्यान, गेल्या सिझनमध्ये पंजाब संघाने बहुतांश सामन्यात कर्णधार बदलले होते. त्यामुळे टीमचं प्रदर्शन गेल्या सिझनमध्ये समाधानकारक होतं. गेल्या सिझनमधील एकूण 14 सामन्यांपैकी सात सामन्यात टीमने विजय मिळवला होता. तर सात सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या प्रदर्शनामुळे संघाला पाचव्या स्थानी समाधान मानावं लागलं.