नवी दिल्ली : यंदाच्या मोसमात चार सुपर सीरीजची विजेतीपदं पटकावणारा भारतीय बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.


संसदीय कामकाज मंत्री विजय गोयल यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून ही शिफारस केली आहे. पद्मश्री हा देशातला चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबरच्या मध्यरात्री संपली. मात्र एका युवा खेळाडूनं बजावलेल्या कामगिरीला प्रोत्साहन मिळावं, या उद्देशानं श्रीकांतच्या नावाची आपण पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस केल्याचं विजय गोयल यांनी सांगितलं.

एकाच मोसमात चार सुपरसीरिज खिशात, किदंबी श्रीकांतचं घवघवीत यश


इंडोनेशियन ओपन…  ऑस्ट्रेलियन ओपन… डेन्मार्क ओपन…  आणि आता फ्रेन्च ओपन सुपर सीरीजच्या या विजेतेपदानं किदम्बी श्रीकांतला थोरामोठ्यांच्या पंक्तीत नेऊन बसवलं आहे. एकाच मोसमात एकदोन नाही, तर चार-चार सुपर सीरीजची विजेतीपदं पटकावणारा किदम्बी श्रीकांत हा जगातला केवळ चौथा बॅडमिंटनवीर ठरला आहे.

भारताची फुलराणी सायना नेहवालचा एकाच मोसमात सर्वाधिक तीन सुपर सीरीज जिंकण्याचा विक्रम त्यानं मोडीत काढला. एकाच मोसमात चार सुपर सीरिज जिंकणारा तो एकमेव भारतीय आहे.

ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या नावाची शिफारसही पद्मभूषणसाठी करण्यात आली आहे.