Khelo India Youth games : जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेने मारलेल्या सुवर्ण चौकारामुळे महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा पदक तालिकेत आघाडी घेतली. महाराष्ट्राची आता २६ सुवर्ण, २९ रौप्य आणि २४ ब्रॉंझ अशी ७९ पदके झाली आहेत. *हरियाणा २२, १६, १५ अशा एकूण ५३ पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. मध्य प्रदेश २१, १३, १९ अशा एकूण ५३ पदकांसह तिसऱ्या स्थानी कायम आहे.
महाराष्ट्राला आता उद्यापासून सुरु होणाऱ्या वेटलिफ्टिंग प्रकारातून चांगल्या यशाची अपेक्षा आहे. त्याचवेळी कुस्तीतही महाराष्ट्र यश मिळवेल अशी आशा आहे. मात्र, या दोन्हीत महाराष्ट्राला हरियाणाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. या दोन खेळाबरोबरच जलतरण स्पर्धेतील पदकावर आता पदकतालिकेतील क्रमवारी अवलंबून राहणार असेल यात शंका नाही. 


कबड्डीत मुलांचा विजय
गेल्या स्पर्धेत ब्राँझपदक विजेत्या महाराष्ट्राने बिहारचा सुरशीच्या लढतीत ३८-३२ असा पराभव करून विजयी सलामी दिली. अजित चौहानच्या खोलवर चढाया आणि जयेश महाजन, अनुज गाढवेचा भक्कम बचाव यामुळे महाराष्ट्राचा विजय सुकर झाला. बिहारकडून विशाल कुमार आणि अंकित सिंगचा खेळ उल्लेखनीय ठरला. मुलांची गाठ आता राजस्थानशी पडणार आहे. मुलींच्या गटात मात्र महाराष्ट्राला हरियानाकडून २५-४१ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला.


४ बाय ४०० मीटर रिलेत मुलींना सुवर्ण
महाराष्ट्राच्या मुलींनी ४ बाय १०० मीटर पाठोपाठ ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीतही सुवर्ण कमाई केली. ॲथलेटिक्समध्ये महेश जाधवने लांब ऊडीत रौप्यपदकाची कमाई केसली. श्रावणी देसावळेचीही उंच उडी रुपेरी यशापर्यंत गेली.  ईशा जाधव, वैष्णवी कस्तुरे, रिया पाटील, अनुष्का कुंभार या महाराष्ट्राच्या मुलींच्या चमूने ३ मिनिट ५२ सेकंद वेळ देत सुवर्णुपदक कमावले. श्रावणीने १.६३ मीटर, तर महेश जाधवने ७.११ मीटर उंची उडी मारली. दोघांचे प्रयत्न त्यांना रौप्यपदकापर्यंत घेऊन गेले. ८०० मीटर शर्यतीत रिया पाटीलने २ मिनिट १२.५६ सेकंद वेळ देताना ब्रॉंझपदक मिळविले. रिया कोल्हापूरला अभिजीत म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. 


जिम्नॅस्टिकमध्ये सुवर्णभरारी
महाराष्ट्राच्या संयुक्ता काळेने आपल्या जबरदस्त कामगिरीने महाराष्ट्राची पदकतालिकेतील बाजू भक्कम केली. संयुक्ताने तालबद्ध जिम्नॅस्टिक प्रकारात ४ सुवर्ण, १ रौप्य असी पाच पदकांची कमाई केली. किमयाने ३ ब्रॉंझपदके मिळविली. संयुक्ताने सुवर्णपदक पटकाविताना हूप प्रकारात २६.२५, बॉल मध्ये २६.१५, क्लबमध्ये २५.४५, रिबनमध्ये २४.५५ गुण पटकावले. तिची जोडीदार किमयाने बॉलमध्ये २२.३५, क्लबमध्ये १९.९५, रिबनमध्ये १९.६५ गुण मिळवून ब्रॉंझपदकाची कमाई केली. जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला असून, महाराष्ट्राने या क्रीडा प्रकारात ७ सुवर्ण, ५ रौप्य आणि ७ ब्रॉंझपदके मिळविली. जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी सर्वसाधारण विजेतेपद मिळविले, तर मुलांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.