Khelo india Games : हरियाणा येथील पंचकुला या ठिकाणी पार पडलेल्या खेलो इंडिया 2022 स्पर्धेत (Khelo India Youth Games 2022) महाराष्ट्राच्या सर्वच खेळाडूंनी चांगलच मैदान गाजवलं. तब्बल 45 सुवर्णपदकं, 40 रौप्य आणि 40 कांस्यपदकावर नाव कोरल्यानंतर एक यशस्वी चमु म्हणून महाराष्ट्र स्पर्धेत नावारुपाला आला आहे. या कामगिरीमुळे सर्वच स्तरातून महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक होत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांनीही खेळाडूंचं कौतुक केलं आहे.
'महाराष्ट्राची क्रीडा परंपरा उज्ज्वल अशी आहे. या क्रीडा परंपरेचा गौरव वाढवणारी आणि महाराष्ट्राच्या नावाला सुवर्णपदकांनी झळाळी देण्याची कामगिरी आपल्या जिगरबाज खेळाडूंनी केली आहे, अशा ठाकरे यांनी स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचं कौतुक केलं आहे. या यशासाठी स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि व्यवस्थापक आदींचे तसेच खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.
स्पर्धेचा शेवटही गोड
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत कांस्य आणि रौप्य पदकांसह सुवर्ण पदकांना देखील गवसणी घातली. आज स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी देखील महाराष्ट्राच्या मुलांसह मुलींच्या खो-खो संघाने सुवर्णपदक पटकावलं. विशेष म्हणजे दोन्ही संघानी अंतिम सामन्यात ओरिसाच्या संघाला पराभूत केलं. मुलींच्या स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर पंजाब आणि पश्चिम बंगाल राहिला. तर मुलांमध्ये पश्चिम बंगाल आणि दिल्लीला कांस्यपदक मिळाले. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी सुवर्ण पदक पटकावत स्पर्धेचा शेवट गोड केला. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजय मिळवल्यानंतर जय भवानी-जय शिवाजी असा जयघोष झाला. त्यानंतर महाराष्ट्राने आणलेल्या ढोलाच्या तालावर खेळाडूंनी नाच ही केला. त्यात ओरिसा आणि पश्चिम बंगालमधील खेळाडू देखील सहभागी झाले. त्यामुळे अगदी आनंदी माहोल त्याठिकाणी झाला होता.
हे देखील वाचा-
- Khelo India Youth Games 2022 : खो-खोमध्ये महाराष्ट्रच अव्वल, मुलांसह मुलींनी पटकावलं सुवर्णपदक
- Kajol Sargar in Khelo India : सांगलीत पानपट्टी चालवणाऱ्याच्या मुलीला खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक
- Khelo India Youth Games 2022 : खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राचा दबदबा, टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक