नांदेड : रेल्वेची गर्दी आणि सहज मोफत प्रवासाची संधी साधून घर सोडणारी अल्पवयीन मुले रेल्वेने पळून जात असल्याची माहिती  समोर आलेय.  अनेक जण आई - वडिल रागावले, मोबाईल, टॅब,  लॅपटॉप पाहिजे म्हणून थेट रेल्वेस्थानक गाठतात.  मागील सात वर्षात नांदेड ते मनमाड या मार्गावर सुमारे 800 हून अधिक मुले रेल्वेने घर सोडून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


 दरम्यान बाहेरची माहिती नसल्याने भांबावलेल्या अवस्थेत कोणाच्या तरी नजरेस पडतात. पुन्हा आई - वडिल रागवतील ही भीती त्यांच्या मनात असते. या मागील पार्श्वभूमी तपासली असता, आई -बाबा मोबाईल घेऊन देईनात, माझ्या मित्राकडे महागडा मोबाईल, लॅपटॉप, गाडी आहे. मला देखील गाडी हवी आहे. अभ्यास नाही केला म्हणून आई बाबा रागवतात यासह अनेक कारणांनी मुले थेट घर सोडून रेल्वेने पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. नांदेड चाईल्ड लाईन चाईल्ड केअर यांची घरातून निघून गेलेल्या गेल्या पाच वर्षांपासूनची मुलांची आकडेवारी पाहिली तर थक्क करणारी आहे. सन 2018 ते 2022 या पाच वर्षात तब्बल 2345 मुलांनी विविध कारणांनी घर सोडले आहे.


2018-19 चाईल्ड लाईन 1098 प्रकरण - 383



  • हरवलेले मुले - 61

  • मारहाण झाल्यामुळे घर सोडलेली - 63


2019-20 चाईल्ड लाईन 1098 एकूण प्रकरणे - 729



  • हरवलेले मुले-105

  • मारहाण झाल्याने घर सोडलेले-153


 2020-21 चाईल्ड लाईन 1098 एकूण प्रकरणे-661



  • हरवलेले मुले-51

  • मारहाण झाल्याने घर सोडलेले-52


2021-22 चाईल्ड लाईन 1098 एकूण प्रकरण-572



  • हरवलेले मुले-97

  • मारहाण झाल्याने घर सोडलेली -20


2018 ते 2022 या पाच वर्षात चाईल्ड लाईनच्या एकूण प्रकरणे - 2345



  •  पाच वर्षात हरवलेले मुले-314

  • मारहाण झाल्याने आई वडील रागावल्याने घर सोडलेली मुले-288 


या मुलांमध्ये अल्पवयीन मुलाचा भरणा जास्त असून मोबाईलसाठी अनेकांनी घर सोडल्याचे पुढे आले आहे. सन 2014 पासून नोव्हेंबर 2021 पर्यंत 857 मुलांनी घर सोडले होते यातील 800 पेक्षाही अधिक मुलांना त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले तर काही मुले स्वतः च परतली आहेत. दरम्यान विविध चैनीच्या वस्तूसाठी किंवा मोबाईलच्या नादात ही अल्पवयीन मुले घरातून घर सोडत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. 


घरातून विविध कारणांनी पसार झालेली मुले शोधून  त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्याचे काम चाईल्ड लाईन 1098 व रेल्वे पोलीस सातत्याने करत आहे. दरम्यान मुलांच्या या व्यसनावर अटकाव घालण्यासाठी पालकांनीही पुढे येऊन मुलांवर नीट लक्ष ठेवणे योग्य समायोजन साधने गरजेचे आहे.


विविध सुख-वस्तूसाठी मुलांचे घरातून पलायन करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान अशा मुलांना शोध घेण्यासाठी चाईल्ड लाईन 1098 ,लोहमार्ग पोलीस, रेल्वे ,बसस्थानक या विविध ठिकाणी कार्यरत आहे. तर अशा घटनांना अटकाव घालण्यासाठी  ,बॅनर, फ्लेक्स व विविध कार्यक्रम घेऊन जनजागृती करत आहे. दरम्यान घरातून निघून गेलेल्या या मुलांना रेल्वे सेना, लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा दलांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधिन केले आहे.