Khelo India Youth Games 2022 :  महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाने आज (शनिवार) दुसऱ्या दिवशीही विजयी घोडदौड कायम ठेवली. छत्तीसगडच्या संघावर ६२ विरूद्ध १८ असा ४४ गुणांनी दणदणीत विजय मिळवित दिमाखात पुढची फेरी गाठली. या सामन्यात महाराष्ट्राने छत्तीसगडवर तब्बल पाच लोण चढवले. ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे कबड्डी मैदान आजही महाराष्ट्राने गाजवले. ऋतुजा अवघडी, यशिका पुजारी आणि हरजीतकौर संधूने आजही धडाकेबाज खेळ केला. पहिल्या तीन मिनिटांत महाराष्ट्राच्या मुलींनी छत्तीसगडच्या संघाचा अंदाज घेतला. त्यानंतर आक्रमण सुरू केले. उत्कृष्ट पकडी आणि चढाई केल्याने गुणांची मोठी आघाडी घेता आली.


पहिल्या हापमध्ये दोन आणि दुसऱ्या हापमध्ये तीन असे पाच लोण महाराष्ट्राने छत्तीसगडवर चढवले. प्रत्येक चढाईत छत्तीसगडचे गडी बाद केले जात होते. पकडीही तितक्याच कौशल्याने होत होत्या. शेवटची दहा मिनिटे उरली असताना गुणफलक होता ४१ विरूद्ध १४. महाराष्ट्राने सुरूवातीपासून सामन्यावर मजबूत पकड ठेवली होती. परिणामी हा सामना एकतर्फी झाला. संघाने आज चढाईत सर्वाधिक गुण मिळवले. उद्या (रविवारी) आंध्र प्रदेशसोबत लढत होणार आहे.


चमकदार खेळ
हरजीतकौर (१३ गुण), मनिषा राठोड (१२) यांनी चढाईत कमाल केली. डिफेन्समध्ये कोमल ससाणे (५), यशिका पुजारी (७), शिवरजनी पाटील (४), ऋतुजा अवघडी (३), निकिता लंगोटे (२), मुस्कान लोखंडे (२), किरण तोडकर (२) यांनीही गुण मिळवित संघाला विजय मिळवून दिला. अनुजा शिंदे आणि हर्षदा पाटील या आज राखीवमध्ये होत्या.


बॅडमिंटनमध्ये पहिला विजय -
बॅडमिंटनच्या मुलांच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्रालने विजय मिळविला. दर्शन पुजारी याने तामीळनाडूच्या थांगम कविन याचा दोन सेटमध्ये पराभव केला. उद्या त्याचा सामना उत्तराखंडच्या प्रणव शर्मासोबत होणार आहे. ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समधील सुसज्ज बॅडमिंटन हॉलमध्ये हे सामने सुरू आहेत. स्पर्धेचा आज दुसरा दिवस होता. दर्शन पुजारीने (मुंबई) सुरूवातीपासून आक्रमक खेळ केला. थांगम त्याचा अंदाज घेत होता. परंतु लगेच महाराष्ट्राच्या दर्शनने दोन गुण घेत चांगली सुरूवात केली. नंतर ही आघाडी त्याने वाढवत नेली. थांगमला त्याने डोके वर काढू दिले नाही. दर्शनने पहिला सेट (२१ विरूद्ध १०) जिंकून सामन्यात आघाडी घेतली. फोरहँड आणि बॅकहँड हे दोन्ही फटके तो लीलया मारत होता. खास करून त्याने स्मॅश जास्त मारले. पहिला सामना हरलेला थांगम दबावाखालीच खेळत होता. त्यामुळे गुणफलक १९ विरूद्ध ७ असा झाला. काही चुकीचे फटके मारल्याने थांगमला गुण मिळाले. परंतु सरळ सेटमध्ये दर्शनने त्याचा पराभव केला. दोन्ही सेट त्याने २१ विरूद्ध १० आणि २१ विरूद्ध १० अशा फरकाने जिंकले.