ढाका : बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार खालिद महमूद याला हृदयविकाराचा झटका आला असून त्याला पुढील उपचारांसाठी सिंगापूरला नेण्यात आलं आहे.


46 वर्षीय खालिदला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याच्यावर ढाकामधील युनायटेड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले होते. पण त्याची प्रकृती अधिक बिघडत असल्यानं बांगलादेश क्रिकेट बोर्डानं मीरपूरमध्ये एक आपातकालीन बैठक बोलवली. ज्यामध्ये त्याला पुढील उपचारासाठी सिंगापूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

खालिद हा बांगलादेशचा तिसरा कसोटी कर्णधार होता. 2001 साली त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. खालिदनं बांगलादेशसाठी 17 कसोटी आणि 77 वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत खालीदनं 58.46च्या सरासरीनं 266 धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये 67.83च्या सरासरीनं वनडेमध्ये त्यांनी 991 धावा केल्या आहेत. 2003 साली त्याला बांगलादेश संघाचा कर्णधार करण्यात आलं होतं. त्याने 9 कसोटी आणि 15 वनडे सामन्यात संघाचं नेतृत्व केलं.

दरम्यान, खालिद अष्टपैलू म्हणून संघात खेळात होता. त्यामुळेच गोलंदाजीतही त्याची चांगली कामगिरी होती. कसोटीत खालिदनं 13 बळी घेतले होते तर वनडेमध्ये 67 बळी त्याच्या नावावर जमा आहेत. 2006 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.