लंडन : दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसननं विम्बल्डनच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये धडक मारली. पण त्यासाठी अँडरसनला उपांत्य सामन्यात तब्बल सहा तास 35 मिनिटं संघर्ष करावा लागला. अखेर अँडरसननं अमेरिकेच्या जॉन इस्नरचं कडवं आव्हान 7-6, 6-7, 6-7, 6-4, 26-24 असं मोडून काढलं.
विम्बल्डनच्या इतिहासातला हा सर्वाधिक वेळ रंगलेला आजवरचा दुसरा सामना ठरला. विशेष म्हणजे यंदा पुरुष एकेरीत केविन अँडरसन आणि रॉजर फेडरर यांच्यामधला उपांत्यपूर्व फेरीचा सामनाही चार तास तेरा मिनिटं रंगला होता. त्यात अँडरसननं फेडररवर 2-6, 6-7, 7-5, 6-4, 13-11 अशी मात केली होती. याचा अर्थ लागोपाठ दोन सामन्यांमध्ये मिळून अँडरसन दहा तास अठ्ठेचाळीस मिनिटं कोर्टवर होता.
अँडरसन आणि इस्नर या दोन गगनचुंबी टेनिसवीरांमधला उपांत्य सामना त्यांच्या उंचीमुळं आधीच चर्चेचा विषय ठरला होता. केविन अँडरसन हा सहा फूट आठ इंच उंच असून, इस्नर त्याच्यापेक्षा दोन इंचानं अधिक उंच आहे. प्रत्यक्ष सामन्यात अँडरसन आणि इस्नर या दोघांनी आपला खेळच इतक्या उंचीवर नेला की, शारीरिक उंचीपेक्षा त्यांच्या खेळाचीच अधिक चर्चा होत आहे. तीन टायब्रेकर आणि 102 बिनतोड सर्व्हिस हे अँडरसन आणि इस्नरमधल्या सामन्याचं वैशिष्ट्य ठरलं. या सामन्यात निर्णायक घाव अखेर अँडरसननंच घातला.
दरम्यान, जॉन इस्नरनं अँडरसनला उपांत्य फेरीतल्या विजयासाठी सहा तास 35 मिनिटे संघर्ष करायला लावून, आपल्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद केली. विम्बल्डनच्या इतिहासात हा सर्वाधिक वेळ रंगलेला दुसऱ्या क्रमांकाचा सामना ठरला. विशेष म्हणजे विम्बल्डनमधल्या सर्वाधिक काळ रंगलेल्या सामन्यातही जॉन इस्नरचाच सहभाग होता. २०१० सालच्या विम्बल्डनमध्ये जॉन इस्नर आणि फ्रान्सचा निकोलस माहुट यांच्यामधला पहिल्या फेरीचा सामना तब्बल अकरा तास पाच मिनिटं रंगला होता.