रिओहून आलेल्या कविता राऊतची झिका व्हायरससाठी तपासणी
एबीपी माझा वेब टीम | 23 Aug 2016 02:25 AM (IST)
नाशिक : ब्राझिलमध्ये सध्या झिका फिव्हरचा व्हायरस पसरला आहे. त्यामुळे ब्राझिलमधून रिओ ऑलिम्पिक खेळून आलेल्या धावपटू कविता राऊतची नाशिक जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. ब्राझिलच्या उच्च आयुक्तांकडूनच तसे आदेश भारतीय आयुक्तांना देण्यात आले होते. त्यानंतर कविताची रक्त तपासणी करण्यात आली आणि तिला रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. मात्र कविताने जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिल्याने तिचे रक्ताचे नमुने आता पुण्याला पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातर्फे देण्यात आली. भारताची स्टीपलचेस अॅथलीट सुधासिंगला झिका तापाची लागण झाल्याचा संशय आहे. तिला वैद्यकीय उपचारांसाठी बंगळुरुच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 20 ऑगस्टला बंगळुरूत परतलेल्या सुधासिंगला ताप आणि अंगदुखीचा त्रास होत आहे. ही लक्षणं 'झिका'ची असल्याची भीती असून, सुधाला 'झिका'वरच्या उपचारांसाठी औषधं सुरू करण्यात आली आहेत.