नागपूर : काटोलच्या नगर परिषदेतील शाळेत शिकताना त्याने कठोर मेहनत करून अत्यंत विपरीत परिस्थितीत खो-खोसारख्या खेळात नाव कमावले. आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर जिल्हा स्तरावरील स्पर्धेपासून राष्ट्रीयपर्यंत अमिट छाप सोडली. एका छोट्याशा गावातून आलेला हा खेळाडू आता अल्टिमेट खो-खो लीगच्या निमित्ताने टीव्हीवर झळकणार आहे. ही प्रेरणादायी कहाणी आहे काटोलचा राष्ट्रीय खो-खोपटू दिलराजसिंग सेंगरची.


26 वर्षीय दिलराजची क्रिकेट व प्रो-कबड्डीच्या धर्तीवर प्रथमच खेळल्या जाणाऱ्या अल्टिमेट खो-खो लीगसाठी निवड झाली आहे. बालेवाडी (पुणे) येथे येत्या 14 ऑॅगस्टपासून सुरू होत असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी दिलराजसह विदर्भातील एकूण पाच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. दिलराजचा सर्वोत्तम 'अ' श्रेणीत समावेश असून, त्याला पाच लाख रुपये देऊन राजस्थान वॉरिअर्सने आपल्या संघात घेतले आहे. या स्पर्धेचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण होणार असल्याने दिलराजचा खेळ हजारो-लाखो खो-खोप्रेमींना पाहायला मिळणार आहे. खो-खो लीगसाठी निवड होणे, ही माझ्यासाठी आनंद व अभिमानाची बाब असल्याचे सांगून, आतापर्यंत केलेल्या परिश्रमाचे हे फळ असल्याचे दिलराजने सांगितले.


वडिलांच्या निधनानंतर आईने सांभाळले


काटोलच्या विदर्भ क्रीडा मंडळाचा खेळाडू असलेल्या दिलराजने संघर्ष अगदी जवळून पाहिला आहे. केवळ दीड वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यामुळे दिलराज व त्याच्या थोरल्या बहिणीच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी आईच्या (रेखा सेंगर) खांद्यावर येऊन पडली. रेखा यांनी हार न मानता 'आरडी'ची कामे करून जिद्दीने दोन्ही मुलांना घडविले. मुलांनीही आईच्या परिश्रमाचे चीज केले. मुलगा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू बनला, तर एका हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट असलेली मुलगीही स्वतःच्या पायावर उभी झाली. दिलराजलाही स्पोर्ट्स कोट्यातून वन विभागात नोकरी लागली.


लहानपणापासूनच खेळाची आवड


दिलराजला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. काटोलमध्ये खो-खोची प्रचंड क्रेझ असल्याने व त्याची आई स्वतः खो-खो खेळाडू राहिल्याने साहजिकच त्याचीही पावले या दिशेने वळली. नगर परिषद शाळेत चौथ्या इयत्तेत शिकत असताना प्रशिक्षक सुनील सोनारे यांच्या मार्गदर्शनात खो-खोचे प्राथमिक धडे गिरविणाऱ्या दिलराजने त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. तालुका, जिल्हा, विभागीय व राज्य स्पर्धांमध्ये चमक दाखवत तो थेट राष्ट्रीय पातळीवर पोहोचला. सध्या नबीरा कॉलेजमध्ये शिकत असलेला व मंगेश शिरपूरकर यांच्या प्रशिक्षणाखाली सराव करीत असलेल्या दिलराजने आतापर्यंत अकरा नॅशनल्समध्ये विदर्भाचे प्रतिनिधित्व केले आहे. जवळपास तितक्याच राज्य स्पर्धेत तो खेळला आहे. अल्टिमेट खो-खोनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाकडून खेळण्याचे स्वप्न असल्याचे दिलराजने बोलून दाखविले.