Kapil Dev Record :  भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आजपासून जागतिक कसोटी क्रिकेट अर्थात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यानं खेळ सुरु होऊ शकलेला नाही. मात्र या फायनलची जोरदार चर्चा सुरु आहे. दुसरीकडे आज भारताचे दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांची चर्चा सुरु आहे. कपिल देव यांच्याकडे असलेले कौशल्य फारच थोड्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये आहे. भारताला पहिला विश्वचषक मिळवून देणाऱ्या या खेळाडूने भारतीय क्रिकेटला एक नवी उंची प्रदान करुन दिली होती. आज भारतीय संघ कसोटी विश्वचषकाच्या खिताबासाठी लढत असताना कपिल देव यांच्या एका विक्रमाची आज चर्चा होत आहे. 


1983 च्या वर्ल्डकपमध्ये आजच्याच दिवशी  कपिल देवने झिम्बाब्वेविरुद्धच्या 138 चेंडूत 175  धावांची  शानदार खेळी केली होती. या खेळीच्या बळावर भारताने विजय मिळवला होता.  बीसीसीआयने याबाबत एक ट्विट केलं असून त्यात कपिल देव यांचा एक फोटोसह या विक्रमाबद्दल आभार मानले आहेत. झिम्बॉम्बेविरुद्ध कपिल देव यांनी 138 चेंडूत 175  धावांची शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला, असं यात म्हटलं आहे. 


या सामन्यात ट्यूनब्रिज वेल्समध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर कपिल देवने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांची अक्षरशा दाणादाण उडाली होती.  भारताची अवस्था  17 धावांवर 5 विकेट्स अशी झाली असताना कपिल देव मैदानात आले आणि वादळी खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेलं.  कपिल देव यांनी एकट्याने संयमाने खेळी करत 16 चौकार आणि 6 षटकार खेचत भारताला मोठी धावसंख्या उभारुन दिली.  भारताने त्यांच्या खेळीच्या बळावर 8 बाद 266 अशी धावसंख्या उभारली. 


त्यानंतर मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली मात्र  मदन लाल आणि रॉजर बिन्नी यांनी जबरदस्त गोलंदाजी करत टीम इंडियासाठी शानदार विजय मिळवून दिला. मदन लाल यांनी 3 विकेट घेतल्या तर बिन्नी यांनी 2 विकेट घेतल्या होत्या.