'भारतीयच आहेस ना?' पाकबाबतच्या सवालाने कपिल देव भडकले
एबीपी माझा वेब टीम | 21 Sep 2016 08:33 AM (IST)
मुंबई : आगामी कबड्डी वर्ल्डकपसाठी आयोजित कार्यक्रमात पोहचलेले भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव पाकिस्तानचं नाव काढताच चांगलेच भडकले. भारतीय कबड्डी संघांची घोषणा आणि जर्सीच्या अनावरणासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कपिल देव या कार्यक्रमासाठी पोहोचल्यानंतर एका पत्रकाराने कबड्डी वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ का नाही, असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर कपिलपाजी चांगलेच भडकले. 'तुम्ही भारतीयच आहात ना?', असा सवाल त्यांनी पत्रकाराला केला. 'ही वेळ आहे का या प्रश्नाची? हा प्रश्न सरकारवर सोडायला पाहिजे. देशाचा क्रीडा प्रतिनिधी म्हणून मला तलावात उडी मारायला सांगितली, तर मी आनंदाने मारेन' असंही देव म्हणाले. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाचं वातावरण आहे. त्यातच कपिल देव यांचाही संताप पहायला मिळाला. अहमदाबादमध्ये पुढील महिन्यात आयोजित कबड्डी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाचं नेतृत्त्व अनुपकुमारकडे सोपवण्यात आलं आहे. मनजीत चिल्लर हा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. येत्या 7 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत कबड्डी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे.