Kane Williamson: न्यूझीलंडचा संयमी कॅप्टन म्हणून ओळखला जाणारा केन विल्यम्सनने अखेर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 35 वर्षीय विल्यम्सनने हा निर्णय स्वतःसाठी आणि संघासाठी योग्य असल्याचे सांगत, या फॉरमॅटमधून आपली सुंदर कारकीर्द संपवली आहे. मात्र, तो अद्याप एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडसाठी खेळत राहणार असून, टी-20 फ्रँचायझी क्रिकेटमध्ये आपला प्रवास सुरू ठेवणार आहे.

Continues below advertisement

केन विल्यम्सनचा टी-20 प्रवास

2011 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विल्यम्सनने एकूण 93 सामने खेळले असून, त्यात 33 च्या सरासरीने 2575 धावा केल्या आहेत. या धावसंख्येत 18 अर्धशतके आहेत, तर त्याची सर्वोच्च धावसंख्या 95 इतकी आहे. तो न्यूझीलंडचा दुसरा सर्वाधिक टी-20I धावा करणारा फलंदाज म्हणून निवृत्त झाला आहे.  

कर्णधारपदातील यशस्वी कारकीर्द

विल्यम्सनने ब्लॅककॅप्सचे 75 टी-20 सामन्यांमध्ये नेतृत्व केले. त्याच्या कर्णधारपदाखाली न्यूझीलंड संघाने दोन वेळा टी-20 विश्वचषकाची उपांत्य फेरी (2016 आणि 2022) गाठली आणि 2021 मध्ये फायनलपर्यंत मजल मारली. जरी फायनलमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला, तरी त्या सामन्यात विल्यम्सनने केलेली 85 धावांची अप्रतिम खेळी आजही न्यूझीलंडच्या टी-20 इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळ्यांपैकी एक मानली जाते.

Continues below advertisement

निवृत्तीचे कारण आणि आगामी ध्येय

विल्यम्सनने निवृत्तीचा निर्णय घेताना म्हटले, “टी-20 फॉरमॅटमधून बाहेर पडण्याची ही वेळ मला आणि संघाला योग्य वाटली. यामुळे संघाला भविष्यातील मालिकांसाठी आणि पुढील विश्वचषकासाठी स्पष्ट दिशा मिळेल.” तो आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी करत आहे, जी 2 डिसेंबरपासून ख्राईस्टचर्चमध्ये सुरू होणार आहे.  

न्यूझीलंड क्रिकेटची प्रतिक्रिया

न्यूझीलंड क्रिकेटचे सीईओ स्कॉट वेनिंक यांनी विल्यम्सनच्या निर्णयाचा आदर व्यक्त करत त्याचे कौतुक केले. त्यांच्या मते, “विल्यम्सनचे नेतृत्व आणि धावांची सातत्यपूर्ण कामगिरी अतुलनीय होती. त्याने टी-20 संघाला एक मजबूत स्थितीत सोडले आहे. आपल्या उत्कृष्ट कारकिर्दीचा शेवट कसा करायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्याने आपल्या कामगिरीतून मिळवला आहे.” वेनिंक यांनी असेही नमूद केले की, विल्यम्सन हा पूर्ण निवृत्तीनंतर न्यूझीलंड क्रिकेटचा खरा दिग्गज (Legend) म्हणून ओळखला जाईल.

इतर महत्वाच्या बातम्या