मुंबई: दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू जेपी ड्युमिनीनं आयपीएलच्या दहाव्या मोसमातून माघार घेतली आहे. ड्युमिनीचा हा निर्णय त्याच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स फ्रँचाईझीच्या दृष्टीनं मोठा धक्का मानला जात आहे.
जेपी ड्युमिनी हा गेल्या दोन मोसमांपासून दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सदस्य आहे. गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये त्यानं दिल्ली डेअरडेव्हिल्सचं नेतृत्त्वही केलं होतं. पण यंदा त्यानं वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली असल्याची माहिती दिल्ली डेअरडेव्हिल्सचे मुख्य कार्यकारी हेमंत दुआ यांनी दिली.
दुसरीकडे दिल्ली महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन यंदाच्या आयपीएलच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्यात आला आहे.
दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांच्या 22 एप्रिलच्या सामन्यांच्या आयोजनात हा बदल करण्यात आला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार 22 एप्रिलला दिल्ली आणि मुंबई संघांमधला सामना दिल्लीत चार वाजता, तर पुणे आणि हैदराबाद संघांमधला सामना पुण्यात आठ वाजता खेळवण्यात येणार आहे.
नव्या कार्यक्रमानुसार 22 एप्रिलचा दिल्ली आणि मुंबई संघांमधला सामना मुंबईत रात्री आठ वाजता खेळवण्यात येईल. त्याच दिवशी पुणे आणि हैदराबाद संघांत पुण्यात होणारा सामना हा दुपारी चार वाजता सुरू होईल.