राजस्थानचा ‘रॉयल’ शिलेदार - जॉस बटलर
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई | 18 May 2018 06:37 PM (IST)
आयपीएल प्ले ऑफच्या या शर्यतीत राजस्थान रॉयल्सचं आव्हान जिवंत ठेवणारा इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जॉस बटलर आयपीएलच्या मोसमात जबरदस्त फॉर्मात आहे.
मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमात राजस्थानच्या रॉयल्ससाठी पैसा वसूल कामगिरी बजावली ती एकट्या जॉस बटलरनं. राजस्थाननं खरं तर कोटीच्या कोटी उड्डाणं करुन बेन स्टोक्स, जयदेव उनाडकट आणि संजू सॅमसनला विकत घेतलं होतं. त्या तिघांच्या तुलनेत राजस्थाननं जॉस बटलरला अगदी स्वस्तात खरेदी केलं होतं. आयपीएलच्या रणांगणात त्याच बटलरनं राजस्थानसाठी उजवी कामगिरी बजावली. आयपीएलच्या रणांगणात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्सनं प्ले ऑफची पहिली दोन तिकीटं आधीच बुक केली आहेत. पण प्ले ऑफच्या अखेरच्या दोन तिकीटांसाठी कोलकाता, मुंबई, बंगळुरु, राजस्थान आणि पंजाब संघांत अजूनही चुरस आहे. आयपीएल प्ले ऑफच्या या शर्यतीत राजस्थान रॉयल्सचं आव्हान जिवंत ठेवणाऱ्या शिलेदाराचं नाव आहे जॉस बटलर. इंग्लंडचा हा यष्टिरक्षक-फलंदाज यंदाच्या आयपीएल मोसमात जबरदस्त फॉर्मात आहे. जॉस बटलरनं यंदाच्या आयपीएल मोसमात सलग पाच अर्धशतकं ठोकण्याचा पराक्रम गाजवला आहे. मागच्या सहा सामन्यांमध्ये त्यानं दिल्लीविरुद्ध 67 धावा, पंजाबविरुद्ध 51 आणि 82 धावा, चेन्नईविरुद्ध नाबाद 95, मुंबईविरुद्ध नाबाद 94 आणि कोलकात्याविरुद्ध 39 धावा अशी कामगिरी बजावली आहे. बटलरच्या याच कामगिरीनं राजस्थानला प्ले ऑफच्या शर्यतीत टिकवून ठेवलं आहे.