मुंबई : भारतात क्रिकेट चाहत्यांची आणि क्रिकेट एक्सपर्ट्सची कमी नाही. आपल्या आवडत्या क्रिकेटवीरांनी आणखी चांगली कामगिरी बजावावी असंच प्रत्येकाला वाटत असतं, आणि म्हणूनच अनेकजण खेळाडूंना काही ना काही सल्लाही देतात.
रायझिंग पुणेचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटलाही काही दिवसांपूर्वी त्याच्या एका छोट्या चाहत्याने असाच अफलातून सल्ला दिला होता.
28 एप्रिलला पुण्याच्या टीमने मुकुंद माधव संस्थेच्या केंद्राला भेट दिली होती. तिथे अपंग कल्याणकारी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी ओमकार पवारने उनाडकटला गोलंदाजीसाठी खास टिप दिली.
चेंडू शिवणीवर नाही तर अक्रॉस द सीम पकडलीस, तर तू हॅटट्रिक काढू शकशील असा सल्ला ओमकारने दिला होता. स्वतः जयदेवनेच तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
ओमकार पवारने उनाडकटला हॅटट्रिकसाठी खास ट्रिक शिकवली आणि खरोखरच काही दिवसांनी उनाडकटने हॅटट्रिक साजरी केली. उनाडकटने 6 मे रोजी हैदराबादविरुद्धच्या सामन्यातील अखेरच्या षटकात बिपुल शर्मा, रशिद खान आणि भुवनेश्वर कुमारला लागोपाठच्या चेंडूंवर बाद करण्याचा पराक्रम गाजवला होता.