कोलंबो (श्रीलंका) : आशिया कपमध्ये पावसाने रडीचा डाव खेळल्यानंतर श्रीलंकेच्या ग्राऊंड स्टाफने दाखवलेली जिद्द आणि मेहनत अवघ्या जगाने पाहिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि मिळेल त्या साधनाने खेळपट्टी आणि ग्राऊंड कोरडे करण्यासाठी स्टाफने केलेली मेहनत आदर्शवत होती. त्यांच्य मेहनतीची आणि जिद्दीची दखल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव यांनी घेतली आहे. त्यांनी ग्राऊंड स्टाफला तब्बल 42 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. भारत आणि श्रीलंका सामन्यातही पावसाने घोळ घातला होता. यावेळी ग्राऊंड स्टाफने केलेली मेहनत अवघ्या जगाने पाहिली होती. 


जय शाह यांनी ट्विट करून ग्राऊंड स्टाफला इनाम जाहीर केलं आहे. त्यांनी ट्विट करून  म्हटले आहे की, आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आणि श्रीलंका क्रिकेट (SLC) यांना कोलंबो आणि कॅंडी येथील समर्पित क्युरेटर्स आणि ग्राऊंड्समन यांना 50 हजार अमेरिकन डाॅलरचे योग्य बक्षीस रक्कम जाहीर करताना अभिमान वाटत आहे. त्यांची वचनबद्धता आणि कठोर परिश्रमामुळे आशिया करंडक 2023 एक अविस्मरणीय क्षण ठरला. खेळपट्टीच्या परिपूर्णतेपासून ते चकचकीत आउटफिल्डपर्यंत, त्यांनी थरारक क्रिकेट अॅक्शनसाठी स्टेज तयार करण्यात मोलाची कामगिरी केली. ही ओळख क्रिकेटच्या यशात या व्यक्तींची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते. त्यांच्या सेवेचा सन्मान करूया!






रोहित शर्माकडूनही कौतुकाची थाप 


टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने सुद्धा ग्राऊंड स्टाफच्या मेहनतीला सलाम करताना कौतुकाची थाप दिली होती. आशिया कपचे प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोटर्सने ग्राऊंड स्टाफचे कौतुक केले होते व आभार मानले होते. आशिया करंडकमध्ये पावसाने सातत्याने खोडा घातला. त्यामुळे विशेष करून कोलंबो आणि कँडीमधील स्टाफला मैदान पूर्ववत करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली होती.