सिडनी : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील विजयानंतर आता वेळ वनडे मालिकेची आहे. या विजयानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने वनडे मालिकेसाठी संघात मोठा बदल केला आहे. कसोटी मालिकेत भारताच्या विजयाचा हिरो ठरलेला जसप्रीत बुमराला एकदिवसीय मालिकेत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
बुमराला ऑस्ट्रेलिया सीरिजच नाही तर त्यानंतर न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वनडे आणि टी20 मालिकेतही विश्रांती देण्यात आली आहे. एकदिवसीय संघात बुमराऐवजी मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला आहे. तर टी20 मालिकेसाठी सिद्धार्थ कौलला संधी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या विजयात जसप्रीत बुमराने मोलाचं योगदान दिलं होतं. चार सामन्यांच्या मालिकेत त्याने 21 विकेट्स मिळवल्या होता. तसंच तो ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनसह संयुक्तरित्या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळल्यानंतर न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यात पाच वनडे आणि तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल. यावर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाआधी भारतीय संघाची ही अखेरची मालिका असेल.