लंडन : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात दोन पराभवानंतर भारतासाठी खुशखबर आहे. काही वृत्तांनुसार, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा तिसऱ्या कसोटीसाठी पूर्णपणे फिट झाला आहे.

आयर्लंडविरुद्ध डबलिनमध्ये खेळवण्यात आलेल्या टी-20 सामन्यादरम्यान बुमराला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतही त्याला खेळता आलं नाही. बुमराच्या पुनरागमनामुळे भारताची गोलंदाजी आणखी मजबूत होईल.

गेल्या काही महिन्यांपासून बुमरा भारताचा स्ट्राईक गोलंदाजाच्या भूमिकेत आहे. त्याने आतापर्यंत केवळ तीन कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तीनही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत त्याने 3.14 च्या इकॉनॉमी रेटने 14 विकेट घेतल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतून पदार्पण करणाऱ्या बुमरासमोर आता इंग्लंडमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचं आव्हान असेल.

बुमराचं पुनरागमन भारतासाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचं मानलं जात आहे. कारण, इंग्लंडमधील वातावरण वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये जास्त प्रमाणात वेगवान गोलंदाजांचाच दबदबा पाहायला मिळाला.

भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतासमोर आता पुनरागमनाचं आव्हान असेल. मालिकेतील तिसरा कसोटी सामना 18 ऑगस्ट रोजी नॉटिंघममध्ये खेळवला जाईल.