मुंबई : 'मुंबई इंडियन्स'चा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. चाहत्यांच्या नाराजीचं कारण स्टेडियममधील नसून बाहेरचं आहे. आयपीएलच्या प्रमोशननिमित्त 'मुंबई इंडियन्स'ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बुमराह एका सुरक्षारक्षकाशी हात न मिळवताच पुढे जाताना दिसत आहे.


आयपीएलचा पुढचा सीझन शनिवारपासून सुरु होत असून रविवारी मुंबई विरुद्ध दिल्ली सामना होणार आहे. त्यानिमित्त मुंबई इंडियन्सने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत बुमराह सिंगल स्टम्पवर गोलंदाजी करत आहे. मात्र व्हिडिओच्या सुरुवातीला घडलेली एक गोष्ट सर्वांना खटकत आहे.

व्हिडिओमध्ये बुमराह एका कारमधून उतरताना दिसतो. त्यानंतर कारचा दरवाजा उघडणारा स्टेडियमचा दारवान/सुरक्षारक्षक त्याला पाहून नमस्कार करतो. बुमराहही त्याच्यापुढे मान वाकवतो. लगेचच दारवान त्याच्याकडे शेकहँडसाठी हात पुढे करतो. मात्र बुमराह त्याच्याकडे न पाहताच, हात न मिळवताच पुढे निघून जातो.


हा व्हिडिओ पाहून बुमराहचे चाहते चांगलेच संतापले. अनेकांनी जसप्रीत घमेंडखोर असल्याची टीका केली. काही जणांच्या मनात के एल राहुल आणि हार्दिक पांड्या यांच्या 'कॉफी विथ करण'मधील आठवणी ताज्या झाल्या आणि क्रिकेटर्सना मूल्य शिक्षणाची आवश्यकता असल्याचं बऱ्याच जणांनी अधोरेखित केली.

मुळात, जसप्रीतचं सुरक्षारक्षकाने पुढे केलेल्या हाताकडे लक्षच नसल्याची जाणीवही काही जणांना झाली. तो हे जाणूनबुजून करत नसल्याचं काही नेटिझन्सना लक्षातही आलं, मात्र तोपर्यंत 'उचललं बोट आणि केली कमेंट' संस्कृतीला जागत बऱ्याच जणांनी आधीच बुमराहला 'चष्मे लावत' जज केलं होतं!