तुटपुंजी धावसंख्या करुनही मॅचं जिंकणं खरोखरंच आनंददायी असल्याचं कोहलीने म्हटलं.
इंग्लंडला शेवटच्या सहा चेंडूंत विजयासाठी आठ धावांचीच आवश्यकता होती. पण जसप्रीत बुमरानं अखेरच्या षटकात कमाल केली. त्यानं धोकादायक ज्यो रुट आणि जोस बटलरचा काटा काढला आणि केवळ दोन धावा मोजून भारताला पाच धावांनी सनसनाटी विजय मिळवून दिला.
यानंतर कोहली म्हणाला, "विश्वास कायम ठेवणं आवश्यक होतं. सुरुवात चांगली केल्यानंतर ती लय कायम ठेवणं गरजेचं होतं. मात्र स्पिनर्सनी मधल्या काही ओव्हर अप्रतिम टाकल्या. त्यानंतर नेहरा आणि बुमराची भेदक गोलंदाजी जबरदस्त होती"
"काय करायचं आहे हे नेहराला माहीत होतं. मात्र मी काय करु हे बुमराह प्रत्येक बॉलला मला विचारत होता. माझ्या मनात काय आहे, हे जाणून घेण्याचा तो प्रयत्न करत होता. मी त्याला नेहमीच्या शैलीत गोलंदाजी करण्यास सांगितलं", असं कोहली म्हणाला.
याशिवाय कोहलीने सलामीवीर के एल राहुलचंही कौतुक केलं. खेळपट्टीवर टीकून राहणं गरजेचं होतं. फलंदाजी करणं अवघड असताना, राहुलने 47 चेंडूत 71 धावांची खेळी केली.