जमैका : आधी पावसाची साथ आणि मग रोस्टन चेसच्या झुंजार शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने जमैका कसोटी अनिर्णीत राखण्यात यश मिळवलं.


 

खरंतर या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या दिवशी सहा विकेट्सची आवश्यकता होती. पण 4 बाद 48 धावांवरुन खेळण्यास सुरुवात करण्याऱ्या विंडीजच्या खेळाडूंनी पाचव्या दिवशी अगदी चिकाटीने फलंदाजी केली. विंडीजच्या रोस्टन चेसने 269 चेंडूंत पंधरा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 137 धावांची खेळी उभारली. रोस्टन चेसचं कसोटी कारकीर्दीतलं हे पहिलंच शतक ठरलं. चेसने केवळ आपलं शतकंच पूर्ण केलं नाही, तर तीन महत्त्वाच्या भागीदारी रचून विंडीजला सुस्थितीत नेलं.

 

रोस्टन चेस आणि जर्मेन ब्लॅकवूडने पाचव्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी उभारली. मग चेसने शेन डॉवरिचच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 144 धावांची आणि जेसन होल्डरच्या साथीने सातव्या विकेटसाठी 103 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या तोंडातून विजयाचा घास खेचून काढला.

 

पावसाच्या व्यत्ययामुळे या कसोटीच्या चौथ्या दिवशी केवळ 15.5 षटकांचाच खेळ झाला होता.

 

टीम इंडियाच्या गोलंदाजांकडून निराशा

जमैका कसोटी जिंकून टीम इंडियाला मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याची संधी होती. पण पहिल्या डावात प्रभावी मारा करणाऱ्या टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात मात्र साफ निराशा केली. जमैका कसोटीच्या अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी विंडीजला 167 धावांची खिरापत वाढली. त्यात भारताला केवळ एकच विकेट मिळवण्यात यश आलं. मग दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रातही विंडीज फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलच तंगवलं. विंडीजच्या फलंदाजांनी तिन्ही सत्रात मिळून एकूण 340 धावा चोपून काढल्या. तर भारतीय गोलंदाजांना अखेरच्या दिवशी विंडीजच्या केवळ दोनच विकेट काढता आल्या. भारतासाठी मोहम्मद शमी आण अमित मिश्राने प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.

 

भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधला तिसरा सामना 9 ऑगस्टला सेंट ल्युसियामध्ये खेळवला जाणार आहे. जर कसोटी मालिका जिंकायची असेल, तर भारतीय खेळाडूंना आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करण्याची गरज आहे.