लंडन : टीम इंडियाचा शिलेदार शिखर धवन आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खान या दोघांमध्ये साम्य काय? या प्रश्नाचं उत्तर आहे, त्या दोघांची सिग्नेचर स्टाईल.


फरक इतकाच की शाहरुखचं दोन्ही बाहू पसरवून मान लचकवत आणि गालावरची खळी दाखवत मंद स्मित करणं हे त्याच्या रोमँटिक असण्याचं प्रतीक बनलं आहे, तर शिखर धवनचं एका हातात बॅट आणि दुसऱ्या हाताची मूळ आवळून बाहू पसरवणं हे त्याच्या वीरतेचं...पराक्रमाचं प्रतीक बनलं आहे.

धवनचं शतक साजरं झालं की, त्याची ही सिन्गेचर स्टाईल आपल्याला हमखास पाहायला मिळते. धवनला त्या स्टाईलची प्रेरणा शाहरुखकडूनच मिळाली का या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे.

धवन म्हणतो की, पहिल्यांदा शतक झळकावलं त्या वेळी माझ्याकडून नकळत झालेलं सेलिब्रेशन, पुढे माझ्या इतकं अंगवळणी पडलं की, ती माझी स्टाईल बनली. त्यात आनंद व्यक्त करण्याबरोबरच परमेश्वराचे आभार मानायचे एवढीच माझी भावना असते.