मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्त्वात टीम इंडिया आगामी दौऱ्यासाठी आयर्लंडला रवाना झाली आहे. यो यो टेस्टमध्ये नापास झाल्याने अनेक खेळाडूंना संघातलं स्थान गमवावं लागलं. मात्र फिटनेससोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं भारतीय संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केलं.


27 जूनपासून टी-20 मालिका

भारताचा आयर्लंडविरुद्धचा दौरा 27 जूनपासून सुरु होणार आहे. या काळात टीम इंडिया दोन टी-20 सामने खेळणार आहे. मात्र आयर्लंडच्या संघात असा एक खेळाडू आहे, जो या अगोदर भारतीय खेळाडूंसोबतही खेळला आहे. पंजाबचा सिमी सिंह नावाचा गोलंदाज आयर्लंडचं प्रतिनिधित्व करणार आहे.

सिमी सिंहचा जन्म पंजाबमधील मोहालीत झाला. त्याने पंजाबकडून अंडर 14, अंडर 17 आणि अंडर 19 संघाचं प्रतिनिधित्व केलं. मात्र त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी न मिळाल्याने तो आयर्लंडला गेला. 2016 साली वयाच्या 31 व्या वर्षी सिमी सिंह आयर्लंडला स्थायिक झाला.

भारतीय खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव

सिमी सिंह यजुवेंद्र चहल, सिद्धार्थ कौल आणि मनप्रीत गोनी यांसारख्या पंजाबच्या खेळाडूंसोबत खेळला आहे. पंजाबकडून खेळताना तो फलंदाज होता. मात्र आयर्लंडमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीवर भर दिला आणि त्याचा आता संघात ऑलराऊंडर म्हणून समावेश करण्यात आला आहे.

सिमी सिंहने सात वन डे आणि चार टी-20 सामने खेळले आहेत. टी-20 मध्ये त्याने नेदरलँडविरुद्ध पदार्पण केलं होतं.

नेहमीच भारताकडून खेळण्याची इच्छा होती : सिमी सिंह

ज्या दिवशी क्रिकेट खेळण्यासाठी सुरुवात केली, तेव्हाच भारतीय संघासाठी खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं, असं सिमी सांगतो. मात्र पंजाबकडून खेळण्याची संधी न मिळाल्यानतंर आयर्लंडला जाण्याचा निर्णय घेतला. आज त्याच मैदानावर आहे आणि भारतीय खेळाडूंसोबतच खेळणार आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्याची इच्छा असल्याचं सिमीने सांगितलं.