रिओ डि जनैरो : रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत शर्यतीदरम्यान एका सायकलपटूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुरुषांच्या सी 4-5 रोड रेसदरम्यान झालेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
48 वर्षीय बहमान गोल्बर्नेझाद यांना हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांचा मृत्यू झाला. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने यासंदर्भात माहिती दिली आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला.
इराणचे सायकलपटू असलेल्या बहमान यांनी 2012 च्या लंडन पॅरालिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्या निधनानंतर इराणचा झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. रविवारी त्यांचं पार्थिव मायदेशी पाठवण्यात येईल. रविवारीच पॅरालिम्पिक स्पर्धांचा समारोप होणार आहे.
यापूर्वी 1960 मध्ये फ्रेंच सायकलपटू एनमार्क जेन्सन यांचा रोममध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत शर्यतीदरम्यान मृत्यू झाला होता.