पिंपरी-चिंचवड : मराठवाड्यातल्या राजकारण्यांनी वायफळ भांडण्यापेक्षा पाण्यासाठी भांडावं, लोकांच्या संयमाचा फायदा घेऊ नये, असा सल्ला प्रख्यात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिला आहे.


'वर्षभर रिकामं राजकारण करण्यापेक्षा मराठवाड्यातील नेत्यांनी पाण्यासाठी भांडावं. आम्ही सहनशील आहोत, याचा फायदा घेऊ नये' असा सल्ला वजा इशारा अनासपुरे यांनी दिला.

मितभाषी आणि बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणारा कलाकार म्हणून ओळख असणाऱ्या मकरंद अनापुरे यांनी राजकारण्यांच्या निष्क्रीयतेवर पहिल्यांदाच बोट ठेवलं आहे. शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये मराठवाडा मुक्तीदिन संग्रामानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
विशेष म्हणजे, अनासपुरे यांनी हे विधान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासमोरच केलं. यालाच उत्तर देताना सुभाष देशमुख यांनी मराठवाड्यातील जनतेलाच दोषी मानत, तेच कुठं तरी कमी पडत असल्याचा दाखला दिला आणि इस्रायलचं उदाहरण दिलं.