मुंबई : रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली. मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला तो मुंबईकर सूर्यकुमार यादव. सूर्यकुमारने  71 धावांची नाबाद खेळी केली. सूर्यकुमार यादवला सामनावीर किताबानेही गौरवण्यात आलं.

क्वालिफायर वन सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या फायनलचं तिकीट मिळवलं. या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी चेन्नईला चार बाद 131 धावांत रोखून निम्मी कामगिरी फत्ते केली होती. पण मुंबईच्या यशस्वी पाठलागचा प्रमुख सूत्रधार ठरला तो सूर्यकुमार यादव.

सूर्यकुमार यादवने नाबाद अर्धशतक झळकावलंच, पण ईशान किशनच्या साथीने त्याने तिसऱ्या विकेटसाठी 80 धावांची भक्कम भागीदारी रचत मुंबईला विजयाच्या दिशेने नेलं. सूर्यकुमार यादवने 54 चेंडूंत नऊ चौकारांसह नाबाद 71 धावांची खेळी उभारली.

मुंबई इंडियन्सची पोरं हुश्शार! चेन्नईचा धुव्वा उडवून मुंबई फायनलमध्ये


चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईला विजयासाठी 132 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. चेन्नई सुपरकिंग्जमधील अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंग धोनीने पाचव्या विकेटसाठी 66 धावांची अभेद्य भागीदारी रचली होती. रायुडूने नाबाद 42, तर धोनीने नाबाद 37 धावांची खेळी उभारली होती.

आयपीएलच्या बाराव्या मोसमात अंतिम फेरी गाठणारी मुंबई इंडियन्स ही पहिलीच टीम आहे. आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारण्याची मुंबई इंडियन्सची ही पाचवी वेळ आहे.