Mumbai Indians Women vs UP Warriorz, WPL 2023 Playoff, Eliminator 2023 : वुमन्स प्रिमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबईने युपीचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता दिल्ली आणि मुंबई या संघामध्ये फायनलचा थरार रंगणार आहे. आज झालेल्या सामन्यात मुंबईने युपीचा 72 धावांनी पराभव केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत 182 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल युपीचा संघ 110 धावांपर्यंत मजल मारु शकला. मुंबईची ईसी वोंग हिने भेदक मारा करत वुमन्स प्रिमियर लीगमधील पहिली हॅट्ट्रीक नोंदवली.
Nat Sciver-Brunt च्या 72 धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात चार विकेट्सच्या मोबदल्यात 182 धावांचा डोंगर उभारला. यात्सिका भाटिया हिने 21 तर हेली मॅथ्युज हिने 26 धावांचे योगदान दिले. हरमनप्रीत कौर 14 तर अमेलिया केर हिने 29 धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून सोफियाने सर्वाधइक दोन विकेट घेतल्या. तर अंजली सरवनी आणि पी चोप्रा हिने एक एक एक विकेट घेतली.
मुंबईने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना युपीची सुरुवात निराशाजनक झाली. श्वेता शेरावत अवघ्या एका धावेवर तंबूत परतली. त्यानंतर ताहिला सात धावा काढून बाद झाली. त्याशिवाय एलिसा हेली 11 धावा काढून बाद झाली. किरन नवगिरे हिने सर्वाधिक 43 धावांचे योगदान दिले. ग्रेस हेरिस 14, दिप्ती शर्मा 16 यांनी छोटेखानी खेळी केली. पण इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. परिणामी युपीचा संघ 17.4 षटकात 110 धावांत सर्वबाद झाला. मुंबईकडून इसी वोंग हिने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. यामध्ये एकाच षटकात सलग तीन विकेट घेत वोंगने इतिहास रचलाय. वुमन्स प्रीमियर लीगमध्ये पहिली हॅट्ट्रीक वोंग हिने घेतली. वोंगशिवाय साइका इसाकी हिने दोन विकेट घेतल्या.
आता दिल्ली आणि मुंबई यांच्यामध्ये रविवारी 26 मार्च रोजी फायनलचा थरार रंगणार आहे. दिल्ली की मुंबई वुमन्स आयपीएल कोण जिंकणार याकडे क्रीडा चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.