Womens T20 Challenge : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील सुपरनोवाजने (Supernovas) तिसऱ्यांदा महिला टी20 चॅलेंज खिताब जिंकला आहे. शनिवारी झालेल्या फायनल सामन्यात सुपरनोवाजने व्हेलोसिटीचा चार धावांनी पराभव केला. सुपरनोवाजने प्रथम फलंदाजी करताना सात गड्यांच्या मोबदल्यात 165 धावा केल्या होत्या.  डिएंड्रा डॉटिनने विस्फोटक फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली. 166 धावांचा पाठलाग करताना व्हेलोसिटीचा संघ आठ गड्यांच्या मोबदल्यात 161 धावांपर्यंत मजल मारु शकला. सुपनोवाज संघाचे हे तिसरे विजेतेपद आहे. याआधी सुपरनोवाजने 2018 आणि 2019 मध्ये जेतेपद पटकावले होते.  2020 मध्ये ट्रेलब्लेजर्स संघाने चषक उंचावला होता. 2021 मध्ये कोरोना महामारीमुळे स्पर्धा रद्द करण्यात आली होती. या लीगचे यंदाचे हे अखेरचं वर्ष आहे. पुढील वर्षापासून बीसीसीआयने पुरुष आयपीएलच्या धर्तीवर महिला आयपीएलचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सहा संघाचा समावेश असेल.  






सुपरनोवाजने संघाने दिलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना व्हेलोसिटीने दमदार सुरुवात केली होती. पहिल्या दोन षटकात 28 धावांचा पाऊस पाडला होती. पण तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सेफाली वर्मा (8 चेंडूत 15 धावा) बाद झाली. त्यानंतर पुढच्याच षटकात भाटियाही तंबूत परतली. किरण नवगीरे शून्य आणि एन चँथम 6 धावा काढून बाद झाली... व्हेलोसिटी संघाचा डाव अचानक कोसळला. त्यात कर्णधार दिप्ती शर्माही दोन धावा काढून बाद झाली. 64 धावांत अर्धा संघ तंबूत परतला होता. लौरा वोल्वार्ट आणि स्नेह राणा यांनी व्हेलोसिटीचा डाव सावरला.. त्यांनी संघाची धावसंख्या 100 च्या पुढे नेली.  पण मोक्याच्या क्षणी राणाने विकेट फेकली..त्यानंतर केट क्रॉसही सात धावा करुन बाद झाली..एकीकडे वोल्वार्ट तग धरुन फलंदाजी करत होती.. तिने स्पर्धेतील दुसरे अर्धशतक झळकावले.. पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. 
 
 दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना डिएंड्रा डॉटिन (62) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (43) यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर सुपरनोवाजने 7 गड्यांच्या मोबदल्यात 165 धावा केल्या होत्या.  डॉटिनला दोन वेळा जीवनदान मिळाले.. याचाच फायदा घेत डॉटिनने  44 चेंडूत 62 धावांची खेळी केली. तर हरमनप्रीतने 29 चेंडूत 43 धावांचा पाऊस पाडला. सलामी फलंदाज प्रिया पूनिया हिने 28 धावांची छोटेखानी खेळी केली.