IPL 2024 : आयपीएलचा रोमांच महत्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपलाय. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी अखेरच्या सामन्यात चेन्नईविरोधात विजय मिळवावाच लागणार आहे. अटीतटीच्या सामन्याआधीच आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. आरसीबीचे महत्वाचे दोन खेळाडू मायदेशी परतले आहेत. विल जॅक्स आणि रीस टोप्ली हे दोन्ही इंग्लंडचे खेळाडू मायदेशी परतले आहेत. विल जॅक्स यानं आरसीबीसाठी शतक ठोकले होते. विल जॅक्समुळे आरसीबीची मधल्या फळीला मजबूती मिळाली होती. पण आता जॅक्स गेल्यामुळे आरसीबीला मोठा धक्का बसलाय.


राजस्थान रॉयल्सचा सलामी फलंदाज जोस बटलरही मायदेशी परतला आहे. इंग्लंडच्या सर्वच खेळाडूंनी उर्वरित आयपीएलमधून माघार घेतली आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चार सामन्याची टी20 मालिका होणार आहे. त्यासाठी इंग्लंडचे खेळाडू मायदेशी परतले आहेत. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 22 मे ते 30 मे यादरम्यान चार टी 20 सामन्याची मालिका पार पाडणार आहे. त्यानंतर टी20 विश्वचषकाचा थरार होणार आहे. जोस बटलर याच्याकडे इंग्लंडच्या संघाची धुरा आहे. त्यामुळे बटलर यानं आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज, सोमवारी जोस बटलर मायदेशी परतला.  जोस बटलर याच्यासोबत विल जॅक्स आणि रीस टोप्लीही मायदेशी परतले आहेत. 


आरसीबीनं दिली माहिती  - 


विल जॅक्स आणि रीस टोप्ली मायदेशी परतल्याची माहिती आरसीबीने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. आरसीबीने एक व्हिडीओ पोस्ट करत दोन्ही महत्वाचे खेळाडू मायदेशी परतल्याची माहिती दिली. व्हिडीओत विल जॅक्स आणि रीस टोप्लीसाठी संघातील सर्व खेळाडू जमले होते. दिल्ली कॅपिटल्सविरोधातील सामन्यानंतर हे दोन्ही खेळाडू मायदेशी परतले आहेत. 


 
विल जॅक्स यानं 2024 मध्ये आरसीबीसाठी पदार्पण केले होते. त्याने आठ सामन्यात 32.86 च्या सरासरीने 230 धावा केल्या आहेत. त्यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. विल जॅक्स यानं गोलंदाजीही केली. रीस टोप्ली याला यंदाच्या हंगामात चार सामने खेळण्यास मिळाले, त्यामध्ये त्याने चार विकेट घेतल्या. 







इंग्लंडचे कोण कोणते खेळाडू मायदेशी परतले..?


प्लेऑफ आणि फायनलमधून इंग्लंडच्या खेळाडूंनी माघार घेतली आहे. पाकिस्तानविरोधात टी20 मालिका आणि त्यानंतर टी20 विश्वचषक होणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना काढता पाय घेतला आहे. जोस बटलर याच्याशिवाय मोईन अली, विल जॅक्स, फिलिप सॉल्ट यांच्यासह इंग्लंडचे खेळाडू आता आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाहीत. 


पाकिस्तानविरोधात होणाऱ्या टी20 मालिकेसाठी इंग्लंडच्या संघात मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम करन, विल जॅक्स, फिल साल्ट आणि रीस टोप्ली  यांचा समावेश आहे. त्यामुळे या खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. हे सर्व खेळाडू या आठवड्यात मायदेशी परतू शकतात. पंजाबसाठी जॉनी बेयरस्टो आणि सॅम करन खेळत आहे. पंजाबचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे. विल जॅक्स आणि रीस टोप्ली आरसीबीसाठी खेळत आहेत. हे दोन्ही खेळाडू गेल्यास आरीसीबीला धक्का बसणार आहे. त्याशिवाय मोईन अली जाण्यानं चेन्नईलाही फटका बसणार आहे.