IPL 2022 Acution : 2022 च्या आयपीएल (IPL) रणसंग्रामासाठीची लिलाव प्रक्रिया आज पार पडणार आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरु येथे ही खेळाडूंची लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावात अनेक मोठे खेळाडू सामील आहेत. यामध्ये कोणत्या खेळाडूला किती बोली लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयपीएलच्या या हंगामात यंदा लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या फौजा दाखल झाल्या आहेत. त्यामुळं आयपीएलच्या आगामी म्हणजे पंधराव्या मोसमापासून दहा फ्रँचाईझी विजेतेपदाच्या शर्यतीत असतील. दरम्यान, आयपीएल लिलावाच्या इतिहासात गेल्या हंगामात सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू यंदाच्या हंगामात खेळणार नाही. हा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस. राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर तब्बल 16.25 कोटी रुपयांची बोली लावून त्याला संघात घेतलं होतं.
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस यंदाची आयपीएल खेळणार नाही. कारण त्याने गेल्या महिन्यातच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ख्रिस मॉरिस आतापर्यंत आयपीएलच्या 8 हंगामांमध्ये खेळला आहे. या काळात 4 वेगवेगळ्या फ्रेंचायझींसाठी तो खेळला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि राजस्थान रॉयल्ससाठी एकूण 81 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 8 च्या इकोनॉमी रेटने आणि 24 च्या सरासरीने 95 बळी घेतले आहेत. त्याच वेळी, 155 च्या स्ट्राइक रेटने 618 धावा देखील केल्या आहेत.
आयपीएल 2021 च्या हंगामासाठी लिलावामध्ये काही परदेशी खेळाडूंची जोरदार चर्चा झाली होती. आरसीबीने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसनला 15 कोटींना आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला 14.25 कोटींना खरेदी केले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनवर पंजाब किंग्जने 14 कोटी रुपयांची बोली लावली होती. पण या सगळ्यावर राजस्थान रॉयल्स आणि ख्रिस मॉरिसने मात केली. मॉरिसला खरेदी करण्यासाठी राज्स्थानने आयपीएल इतिहासातील गेल्या 14 वर्षातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते. त्यामुळे यंदा हे रेकॉर्ड मोडीत निघणार का? मॉरिसपेक्षा जास्त बोली लागणार का हे पाहणे देखील महत्त्वाटे ठरणार आहे.
दरम्यान, आयपीएलच्या रणांगणात यंदा लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या फौजा दाखल झाल्या असून, त्यामुळं आयपीएलच्या आगामी म्हणजे पंधराव्या मोसमापासून दहा फ्रँचाईझी विजेतेपदाच्या शर्यतीत असतील. आणि त्या शर्यतीची स्टार्टिंग लाईन ही आयपीएलचा मेगा लिलाव असणार आहे. हा मेगा लिलाव येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूत संपन्न होणार आहे. आयपीएलच्या या मेगा लिलावात उपलब्ध 590 खेळाडूंपैकी सर्वोत्तम पर्यायांना आपल्या ताफ्यात सामावून घेण्याचा प्रत्येक फ्रँचाईझीचा प्रयत्न असेल. त्या 590 खेळाडूंमध्ये 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडू आहेत. आयपीएलच्या मेगा लिलावात दहा फ्रँचाईझींकडून आपल्या पसंतीच्या शिलेदारावर दौलतजादा करण्यात येईल.