MS Dhoni  : कोलकाताचे व्यावसायिक संजीव गोयंका लखनौ सुपर जायंट्सचे मालक आहेत. गोयंका यांचा केएल राहुलसोबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत गोयंका केएल राहुल याला झापत असल्याचं दिसत आहे. हैदराबादविरोधात लखनौचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे गोयंका यांना राग अनावर आला. त्यांनी कर्णधार केएल राहुल याची शाळा घेतली. यावरुन सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. आत्मसन्मान जपण्यासाठी केएल राहुलने कर्णधारपद सोडावं असा सल्ला नेटकऱ्यांनी दिलाय. पण संजीव गोयंका यांनी फक्त राहुलसोबत नाही तर याआधी एमएस धोनीलाही वाईट वागणूक दिली आहे. केएल राहुलसोबतच्या व्हिडीओनंतर धोनीसोबत झालेला जुना किस्सा सध्या चर्चेत आहे. 


हैदराबादसोबत दारुण पराभवानंतर संजीव गोयंका यांनी ऑन कॅमेरा केएल राहुल याचा समाचार घेतला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गोयंका सध्या चर्चेत आहे. लखनौचा संघ खरेदी करण्याआधी गोयंका यांनी आयपीएलमध्ये याआधीही एका संघाची मालकी घेतली होती. 2016-17 मध्ये संजीव गोयंका यांनी रायझिंग पुणे सुपर जायंट संघाची खरेदी केली होती. त्यावेळी संघाची धुरा धोनीच्या खांद्यावर होती. पण पुणे संघाच्या खराब कामगिरीनंतर धोनीकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. त्यावेळीही त्याप्रकरणाची चर्चा असते. 


एमएस धोनीची हकालपट्टी - 


रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाची मालकी संवीव गोयंका यांच्याकडे होती. 18 जानेवारी 2016 मध्ये त्यांनी पुणे संघाची घोषणा केली होती. या संघाची धुरा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्या खांद्यावर होती. पण स्पर्धेच्या पुढच्या वर्षी अचानक धोनीला कर्णधारपदावरु हकालपट्टी करण्यात आली. पुणे संघाचं नेतृत्व दुसऱ्या खेळाडूकडे सोपवण्यात आले. 19 फेब्रुवारी 2017 रोजी अचानक धोनीचं कर्णधारपद काढून घेण्यात आले.  धोनीच्या नेतृत्वात पुणे संघाला 14 पैकी फक्त पाच सामन्यात विजय मिळवता आला. गुणतालिकेत पुणे संघ सातव्या क्रमांकावर राहिलाय. त्यावेळी धोनीची बॅटही शांतच राहिली. धोनीला 12 सामन्यात फक्त 284 धावाच करता आल्या. 


स्मिथकडे कर्णधारपद 


2016 मध्ये धोनीच्या नेतृत्वात खराब कामगिरी झाली. त्यामुळे पुणे संघाचा कर्णधार बदलण्यात आला. 2017 च्या आयपीएल हंगामाआधीच धोनीच्या जागी स्टिव्ह स्मिथ याच्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली. धोनीनं स्वत: कर्णधारपद सोडल्याच्या चर्चा त्यावेळी झाल्या होत्या. पण अनेकांच्या मते धोनीची हाकलपट्टी करण्यात आल्याचा दावा होता. स्मिथच्या नेतृत्वात पुणे संघानं 2017 मध्ये फायनलमध्ये धडक मारली होती. त्यावेळी मुंबईने पुण्याचा एका धावेनं पराभव करत चषकावर नाव कोरले ोहते.