MS Dhoni, IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होण्याआधी धोनीनं चेन्नईचं कर्णधारपद सोडलं होतं. चेन्नईची धुरा ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवण्यात आले. धोनीनं कर्णधारपद सोडल्यानंतर पुन्हा एकदा निवृत्तीच्या चर्चेनं जोर धरला. यंदाचा आयपीएल हंगाम हा धोनीचा अखेरचा असेल असा अंदाज वर्तवण्यात आला. धोनीच्या हेअरस्टाइलने त्यात आणखी भर घातली. पण धोनीचा हा अखेरचा आयपीएल हंगाम नसेल.. धोनी पुढील हंगामातही खेळणार असल्याचं समोर आले आहे. धोनी पुढील हंगामातही खेळणार असल्याचं सुरेश रैनानं सांगितलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आरपी सिंग आणि सुरेश रैना यांना धोनी आयपीएल 2025 मध्ये खेळणार का असे विचारण्यात आले होते. आरपी सिंग या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळत असल्याचे दिसत असले तरी सुरेश रैनाने 'खेळणार' म्हणत CSK चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

सुरेश रैना आणि आरपी सिंग हे एमएस धोनीचे खूपच चांगले मित्र मानले जातात.  धोनी आणि रैना यांनी चेन्नईकडून खूप क्रिकेट खेळलं आहे. अशा परिस्थितीत सुरेश रैनाने धोनी या पुढच्या हंगामात खेळण्याचा दावा केला आहे. त्यामुळे धोनी नक्कीच पुढच्या हंगामात खेळेल, अशी चर्चा सुरु झाली आहे.  एमएस धोनी गुडघ्याच्या समस्येने त्रस् असताना सुरेश रैनानं केलेले हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. धोनीला गुडघ्याच्या दुखापतीने ग्रासल्याचं चेन्नईचे गोलंदाजी सल्लागार एरिक सिमन्स यांनी सांगितलं होतं. धोनीला दुखापतीमुळे प्रचंड वेदना होत असतील याची कल्पनाही कोणी करू शकत नाही, असेही सिमन्स म्हणाले.  मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर धोनी हॉटेलमध्ये जाताना लंगडतानाही दिसला होता. त्याशिवाय दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यावेळीही तो मैदानात लंगडताना दिसला होता.

यंदाच्या आयपीएल हंगामात धोनीची शानदार फटकेबाजी - 

आरपी सिंग यानं 2016 मध्ये अखेरचा आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. दुसरीकडे, सुरेश रैना शेवटचा 2021 मध्ये आयपीएल खेळला होता. या दोन्ही खेळाडूंनी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. पण दुसरीकडे वय वाढल्यानंतरही एमएस धोनी अद्यापही आयपीएलचं मैदान गाजवत आहे. आयपीएल 2024 मध्ये, एमएस धोनीने आतापर्यंत केवळ 25 चेंडूंचा सामना केला आहे, ज्यामध्ये त्याने 236 च्या स्ट्राइक रेटने 59 धावा केल्या आहेत.