मुंबई : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्यावर लखनौ सुपर जाएंटस विरुद्धच्या पराभवानंतर अनेकांनी टीका केली. मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवरुन हार्दिक पांड्याला टीकेचं लक्ष केलं जातंय. मुंबईच्या टीम मॅनेजमेटनं यंदाच्या आयपीएलच्या नेतृत्त्वाची जबाबदारी रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याकडे दिली होती. आयपीएल सुरु होण्यापूर्वीपासून मुंबईच्या चाहत्यांमध्ये यासंदर्भात नाराजी होती.  मुंबई इंडियन्सला काल लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर देखील हार्दिक पांड्यावर माजी क्रिकेटपटूंनी टीका केली. मात्र, टीम इंडियाच्या माजी खेळाडूनं हार्दिकचं मनोबल वाढवणारी भूमिका मांडली आहे. हार्दिकच्या बाजूनं भूमिका मांडणाऱ्या खेळाडूचं नाव वसीम जाफर (Wasim Jaffer) आहे. 


वसीम जाफर काय म्हणाला?


तुम्ही हार्दिक पांड्यावर त्याच्या कामगिरीमुळं जितकी टीका करु शकता तितकी टीका करु शकता. सतत होणारं ट्रोलिंग आणि वैयक्तिक हल्ले होणं चुकीचं आहे. हार्दिक तु ठाम राहा. पुढील महिन्यात वर्ल्ड कपमध्ये तुझ्या दमदार कामगिरीनंतर हेच लोकं तुझे गोडवे गाताना दिसतील, असा सल्ला वसीम जाफरनं दिला आहे.    






मुंबई इंडियन्सची पहिली मॅच गुजरात टायटन्स विरुद्ध झाली. या मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मॅच पार पडली होती. गुजरातचा संघ सोडून मुंबईकडे आल्यामुळं तिथल्या प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याविरोधात शेरेबाजी केली. मुंबईचे सातत्यानं होणारे पराभव आणि मैदानावर प्रेक्षकांकडून केलं जाणारं हुटींगमुळं असं दुहेरी दडपण हार्दिक पांड्यावर आल्याचं पाहायला मिळालं. भारतीय क्रिकेट टीमच्या माजी क्रिकेटपटूंनी हार्दिकच्या बाजूनं उभं राहण्याची भूमिका घेतल्याचं दिसून आलं. 


हार्दिक पांड्या लखनौ सुपर जाएंटस विरुद्धच्या पराभवावर काय म्हणाला?


हार्दिक पांड्यानं लखनौ सुपर जाएंटस विरुद्धच्या मॅचमध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आमच्या संघाच्या टॉप ऑर्डरनं चांगल्या धावा करायला हव्या होत्या. पण, टॉप ऑर्डरच्या फलंदाज लवकर बाद झाल्यानं मॅचमध्ये कमबॅक करणं शक्य झालं नाही असं हार्दिक पांड्या म्हणाला. 


दरम्यान, मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 10 मॅचेस खेळल्या आहेत. त्यापैकी केवळ तीन मॅचमध्ये मुंबईला विजय मिळाला असून सात मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मुंबईच्या चार मॅच राहिल्या असून त्यामध्ये मोठ्या फरकानं मुंबईला विजय मिळवावा लागेल. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स कुठपर्यंत मजल मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.


संबंधित बातम्या :


हार्दिक पांड्याला दुहेरी धक्का, बीसीसीआयचा मुंबई इंडियन्सला दणका, पुढच्या वेळी मोठी कारवाई होणार


Hardik Pandya : मुंबई इंडियन्सची पराभवाची मालिका सुरुच, सातव्या पराभवाचं खापर हार्दिक पांड्यानं कुणावर फोडलं?